बेड्या घालून आणले न्यायालयात
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पारनेर: यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असणाऱ्या बाळ बोठे याच्या शनिवारी हैदराबाद येथून पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर आज ( रविवारी ) त्याला पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी बोठेचे वकील व सरकारी वकील यांच्यात झालेल्या युक्तिवादानंतर पारनेर न्यायालयाच्या न्यायाधीश उमा बोऱ्हाडे यांनी बाळ बोठेला दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पारनेर पोलीस स्टेशन ते न्यायालयापर्यंत बोठेला बेड्या घालून चालतच आणला होता. यावेळी पोलिसांचा मोठा गराडा होता.
रेखा जरे यांच्या बहुचर्चित हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला नगर पोलिसांनी हैदराबाद येथून काल ( शनिवारी ) पहाटेच्या सुमारास जेरबंद केले होते.नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली होती.हत्याकांडानंतर 102 दिवस बोठे पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात येऊनही बोठे सापडत नसल्याने पोलीस तपासा बाबतही साशंकता निर्माण झाली होती. पारनेर न्यायालयांने त्याला फरार घोषित केले होते. येत्या 9 एप्रिलपर्यंत बोठे स्वतःहून हजर न झाल्यास त्याच्या संपत्तीवर टाच आणण्याचा निर्णयही न्यायालयाने दिला होता.
नगरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे हैदराबाद येथून बोठे यास ताब्यात घेतल्यानंतर सुपा पोलीस स्टेशनमध्ये अटकेचे सोपस्कर पुर्ण झाल्यानंतर त्याची रवानगी पारनेर पोलीस स्टेशनच्या कोठडीत करण्यात आली आहे. त्याला मिळालेल्या व्हीआयपी वागणूकीमुळे माध्यमांमध्ये टिकेची झोड उठली होती.
बोठेला आज पारनेरच्या न्यायालयात हजर करणार असल्याने त्याची पत्नी, मुले व काही नातेवाईक सकाळपासूनच पारनेर पोलिस स्टेशन व न्यायालयाच्या परीसरात हजर होते. मात्र बोठे भोवती पोलिसांचा गराडा असल्याने त्याला कुटूंबियांना भेटता आले नाही. रेखा जरे यांचा मुलगा रुणाल हेही पारनेरला हजर होते. सर्व गोष्टींवर ते लक्ष ठेवून होते. बोठेला काल दिलेल्या व्हीआयपी वागणूकीवरून रूणाल यांनी नाराजी व्यक्त करीत आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
न्यायालयात झालेल्या युक्तिवादात तपासी अधिकारी डीवायएसपी अजित पाटील व सरकारी वकील सिद्धार्थ बागले यांनी आपली बाजू मांडली. बाळ बोठे आणि रेखा जरे यांचा खून कशाकरता केला? हा कट कोठे रचला ? यामध्ये कोण सामील आहे ? तसेच 7 लाख 70 हजार रुपयांची सुपारी दिली की, आणखी जास्त रक्कमेची ? तसेच रेखा जरे मयत झाल्यानंतर घटनास्थळ ते नगरचे सिव्हिल हॉस्पिटल, रेखा जरे यांच्या अंत्यविधीपर्यंत कोणी 'वॉच' ठेवला होता. बोठेचे कॉलचे व्हाईस सॅम्पल घेणे अद्याप बाकी आहे. हैदराबाद येथे बोठे याला आणखी कोणी आश्रय दिला. कोणी मदत केली ? याबाबतचा तपास बाकी असल्याचे तपासी अधिकारी यांनी सांगितले .
बाळ बोठेचे वकील ऍडवोकेट महेश तवले यांनी न्यायालयासमोर बाजू मांडताना या गुन्ह्यातील दोषारोपपत्र न्यायालयाला सादर झाले आहे. सागर भिंगारदिवे याने या घटनेची संपूर्ण माहिती दिली असून पंचनामा देखील झालेला आहे.कोणी आणि किती रुपयाला सुपारी दिली ? हे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बोठे याला पोलिस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी देण्यात यावी असे म्हणणे ऍडवोकेट बागले यांनी मांडले. यावर पारनेरच्या न्यायाधीश उमा बोऱ्हाडे यांनी बाळ बोठे याला दि. 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्याचा आदेश दिला आहे.
0 टिप्पण्या