Ticker

6/Breaking/ticker-posts

मेडिकल आणि इंजिनीअरिंगसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी यंदा शुल्कवाढ नाही

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पुणेः येत्या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना वाढणाऱ्या शुल्कापासून दिलासा मिळणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी एकूण १०२४ महाविद्यालयांनी शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी 'नो अपवर्ड रिव्हिजन' पर्याय निवडला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांसमोर निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

शुल्क नियामक प्राधिकरणाकडून (एफआरए) उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि कृषी विभागातील अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क ठरविण्यात येते. त्या अंतर्गत आगामी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी, आर्किटेक्चर, वैद्यकीय, अॅग्रिकल्चर, विधी अशा विविध पदवी, पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शुल्क काही दिवसांपूर्वी निश्चित करण्यात आले. त्यानुसार ९२९ कॉलेजांनी गेल्या वर्षीप्रमाणेच शुल्क आकारण्याचे ठरवले आहे; तर ९५ कॉलेजांनी २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी आकारलेले शुल्क आगामी वर्षासाठी आकारण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या महाविद्यालयांनी सलग दोन वर्षे कोणत्याही प्रकारची शुल्कवाढ केलेली नाही. डी-फार्मसी, इंजिनीअरिंग, डिप्लोमा, एमबीए अशा प्रमुख अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही प्रकारची शुल्कवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे पालकांना वाढीव शुल्क भरावे लागण्यापासून दिलासा मिळणार आहे. तंत्रशिक्षण आणि कृषीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क ५० हजार ते दोन लाख रुपयांच्या दरम्यान असते. वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शुल्क एक लाख ते १० लाख रुपयांच्या दरम्यान आहे. ' एफआरए'च्या नियमानुसार या कॉलेजांना दर वर्षी आठ टक्क्यांपर्यत शुल्कवाढ करता येते. मात्र, या कॉलेजांनी कोणत्याही प्रकारची शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या