Ticker

6/Breaking/ticker-posts

गाढवाची वरात थेट महावितरणच्या दारात..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

सांगली: वीज बिल प्रश्नी सोमवारी विटा विभागीय महावितरण कार्यालयावर शेतकरी, घरगुती वीज ग्राहकांनी हटके आंदोलन करून लक्ष वेधले. यावेळी दोन गाढवं आणि कडक लक्ष्मीसह वाजतगाजत महावितरण कार्यालयावर ग्राहकांनी मोर्चा काढला. ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणे न थांबवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्राहकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

लॉकडाऊन काळात थकलेल्या वीज बिलांची वसुली करण्यासाठी महावितरणकडून थकीत ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू आहे. याला ग्राहकांसह विविध संस्था, संघटनांकडून तीव्र विरोध सुरू आहे. सोमवारी विटा येथे संतप्त ग्राहकांनी महावितरणच्या विभागीय कार्यालयावर गाढव मोर्चा काढून राग व्यक्त केला. गोरगरिबांची वीज जोडणी कर्मचारी काहीही ऐकून न घेता तोडत आहेत. एखाद्या बड्या नेत्याचे, श्रीमंतांचे कनेक्शन तोडलेले दाखवा? असा सवाल ग्राहक शंकर मोहिते यांनी अधिकाऱ्यांना विचारला.

लोक पैसे देण्यास तयार असताना कशासाठी मनमानी पद्धतीने वीज तोडणी करता ? मीटर खराब असताना आलेली वीज बिले वेळेत दुरुस्त करून मिळत नाहीत. याबाबत कोणी विचारत नाही म्हणून कसेही कामकाज चालवणार काय ? असा संतप्त सवाल मोहिते यांनी विचारला. महावितरणकडे मीटर उपलब्ध असताना ग्राहकांना बाहेरून दोन तीन हजाराला मीटर विकत घ्यायला लावले जाते. बिघाड झालेले मीटर बदलून देण्याची जबाबदारी कुणाची ? मीटर बदलून न देता अंदाजे हजारो रुपयाची बिले ग्राहकांना पाठवली जात आहेत. महागाईमुळे आधीच जनता त्रस्त झाली असताना ग्राहकांना नाहक त्रास देणे बंद करावे अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली.

यावेळी गाढवांचा प्रतिकात्मक मोर्चा गाढव आणि कडक लक्ष्मीसह वाजत गाजत महावितरण कार्यालय आवारात दाखल झाला. कारभार सुधारला नाही आणि गोरगरिबांची कनेक्शन तोडली तर वीज तोडणी करणाऱ्या कर्मचाऱ्याची गाढवावरून वरात काढू, असा इशारा ग्राहकांनी दिला. महावितरणचे विटा विभागाचे कार्यकारी अभियंता, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 शासनाचे धोरण आणि महावीतरणचा प्रत्यक्ष कारभार यांच्यात तफावत का, असा सवाल विजय पाटील यानी अधिकान्यांना विचारला, मेडिकलचे वीज कनेक्शन तोडताना विचार करा. फ्रीजमध्ये महागडी आणि अत्यावश्यक औषधे असतात. त्याच्या तीव्रतेवर, परिणामकारकतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. याला जबाबदार महावितरण राहील, असा इशारा पाटील यांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या