नगर : सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या
हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. आता विनयभंगाच्या दुसऱ्या एका गुन्ह्यात
त्याला अटक करण्यात येईल. उद्या त्याला नगरच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.
जरे यांच्या हत्येपूर्वीच विनयभंगाची ही घटना घडली होती. मात्र, हत्येच्या घटनेनंतर संबंधित महिलेने पुढे येऊन फिर्याद दिल्याने हा गुन्हा
दाखल झाला होता.
जरे खून प्रकरणात अटकेत असलेल्या बोठेच्या पोलीस
कोठडीची मुदत आज संपली. त्यानुसार त्याला आज पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात
आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यावेळी
न्यायालयात उपस्थित असलेले कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांनी
न्यायालयात अर्ज करून आरोपी बोठे याला विनयभंगाच्या गुन्ह्यात वर्ग करून देण्याची
परवानगी मागितली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोऱ्हाडे यांनी पोलिसांचा हा
अर्ज मंजूर केला. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी बोठे याला ताब्यात घेऊन नगर शहरात
आणले. त्याला आता कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक
करण्यात येईल. उद्या नगर शहरातील न्यायालयात हजर केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
काय आहे दुसरा
गुन्हा
रेखा जरे खून प्रकरणात बोठे याचे नाव पुढे आल्यानंतर
आणखी काही महिला तक्रार देण्यासाठी पुढे आल्या. डिसेंबर २०२० मध्येच एका सामाजिक
कार्यकर्त्या महिलेच्या सूनेने कोतवाली पोलीस ठाण्यात ही फिर्याद दिली आहे. बोठे
याने वेळोवेळी आपलाविनयभंग केल्याचे
त्यामध्ये म्हटले आहे. सप्टेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२० याकाळात विनयभंग केल्याचे
फिर्यादीत म्हटले आहे. सासूशी ओळख असल्याने बोठेचे आमच्या घरी येणे-जाणे असे. घरी
आल्यावर सासूशी बोलत असताना आपल्याबद्दल अश्लील शेरेबाजी करणे, हावभाव करणे, स्पर्श करणे तसेच मोबाइलवर संपर्क
साधून पाठलाग करणे अशी कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कोतवाली पोलिसांनी
बोठेविरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आता त्याही गुन्ह्यात बोठे
याला अटक झाली आहे.
खंडणीचाही गुन्हा
दरम्यान, बोठे याच्याविरूद्ध नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात खंडणीचाही गुन्हा
दाखल आहे. तोही याच कालावधीत दाखल झालेला आहे. मंगल किसन हजारे-भुजबळ (वय ३८,
रा. सागर कॉम्पलेक्स स्टेशन रोड, आगरकर मळा,
नगर) यांनी यासंबंधी फिर्याद दिली आहे. १० जुलै २०१९ ते १२ डिसेंबर
२०२० या काळात हा गुन्हा घडल्याचे त्यांनी म्हटले आहे. नोकरी टिकवायची असेल तर दहा
लाख रुपये द्यावे लागतील, असे बोठे याने धमकावल्याचे
फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अन्य एका आरोपीसह बोठेविरुद्ध हा गुन्हा दाखल
झालेला आहे. त्यामुळे त्यामध्येही बोठेला नंतर वर्ग केले जाऊ शकते.
0 टिप्पण्या