लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
मुंबई: गेल्या
काही दिवसांपासून करोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने
वाढत असतानाच आज राज्यात करोनाचे तब्बल ९ हजार ८५५ नवे रुग्ण आढळल्याने चिंता
वाढली आहे. गेल्या जवळपास साडेचार महिन्यांतील ही सर्वोच्च रुग्णसंख्या ठरली आहे.
दरम्यान, दैनंदिन करोनामुक्त रुग्णांच्या तुलनेत नवीन
बाधितांची संख्या अधिक असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा फुगत चालला असून ही
संख्या सध्या ८२ हजारांचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे. राज्यात करोनाचे रुग्ण
वेगाने वाढत असून दुसऱ्या लाटेची शक्यताही बळावत चालली आहे. रुग्णसंख्या
नियंत्रणात राहण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. अनेक प्रतिबंधात्मक पावले
टाकण्यात येत आहे. दुसरीकडे लसीकरणही युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. असे
असताना रुग्णसंख्या मात्र कमी होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून पाच ते
आठ हजारांच्या प्रमाणात दररोज नवीन रुग्णांची भर पडत आहे. या संख्येने आज मोठी
उसळी घेतली आहे. हा आकडा थेट दहा हजारांच्या घरात जाऊन पोहचल्याने सरकार आणि
आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.
आज राज्यात ४२ करोना बाधित रुग्णांच्या
मृत्यूंची नोंद झाली असून राज्यात आतापर्यंत ५२ हजार २८० रुग्णांना करोनामुळे
प्राणास मुकावे लागले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४० % इतका आहे. आज राज्यात
९ हजार ८५५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ६ हजार ५५९ रुग्ण बरे होऊन घरी परतले
आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ४३ हजार ३४९ करोना बाधितांनी करोनावर मात
करण्यात यश मिळवले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.७७ टक्के एवढे झाले
आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६५ लाख ९ हजार ५०६ प्रयोगशाळा
नमुन्यांपैकी २१ लाख ७९ हजार १८५ (१३.२० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या
राज्यात ३ लाख ६० हजार ५०० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ३ हजार ७०१ व्यक्ती
संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
0 टिप्पण्या