लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नवी
दिल्ली:- सुप्रीम कोर्टाने आयपीएस अधिकारी आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना हायकोर्टात याचिका
दाखल करण्यास सांगितले आहे. सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर '१०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट' दिल्याचा
आरोप केला होता. न्या. संजय किशन कौल आणि न्या. आर. सुभाष रेड्डी यांच्या
खंडपीठाने सांगितले की, प्रकरण गंभीर आहे. तुम्ही
हायकोर्टात याचिका दाखल करा. त्यानंतर सिंह यांना सुप्रीम कोर्टाने याचिका मागे
घेण्याची परवानगी दिली असून, सिंह हे आजच हायकोर्टात
याचिका दाखल करणार आहेत.
परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची
सीबीआयमार्फत निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली होती. पुरावे नष्ट होण्याआधी
तात्काळ सीबीआयमार्फत चौकशी व्हायला हवी, असे ते म्हणाले होते. तसेच देशमुख यांच्या निवासस्थानावरील सीसीटीव्ही
फुटेज तात्काळ ताब्यात घेण्याचे निर्देश देण्याची विनंती केली होती. सिंह यांनी
बदलीचे आदेशही रद्द करण्याची विनंती केली होती.
सुप्रीम कोर्टाने
बुधवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास
नकार देतानाच, हायकोर्टात
याचिका दाखल करण्याचे निर्देश सिंह यांना दिले. सिंह यांनी अनिल देशमुखांविरोधातील
आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. तसेच
ही याचिका मागे घेण्यास परवानगीही दिली.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सिंह हे आपले वकील
मुकुल रोहतगी यांच्यामार्फत आजच हायकोर्टात जाणार आहेत.
दुसरीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वादाप्रकरणी अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेली
याचिका मुंबई हायकोर्टाने ३० मार्चला सुनावणीसाठी निश्चित केली आहे.
0 टिप्पण्या