Ticker

6/Breaking/ticker-posts

महिलेला धमकी ? साफ खोटं, मी शिवसैनिक आहे; अरविंद सावंत यांनी आरोप फेटाळले

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलेले धमकीचे आरोप शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहेत. ' मी आजवर कधी कोणाला धमकी दिलेली नाही. महिलेला धमकावण्याचा तर प्रश्नच येत नाही. मी शिवसैनिक आहे. माझ्याकडून असं कधीच होणार नाही,' असं अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे.

सचिन वाजे  प्रकरणी संसदेत आवाज उठविल्यामुळं अरविंद सावंत यांनी मला धमकी दिल्याची तक्रार राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्राद्वारे केली आहे. 'तू महाराष्ट्रात  कशी फिरतेस तेच बघतो. तुलाही जेलमध्ये टाकणार,' असं सावंत यांनी म्हटल्याचं राणा यांनी पत्रात म्हटलं आहे. त्यावरून शिवसेनेवर टीका होत आहे. मात्र, सावंत यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

'
नवनीत राणा जेव्हा कधी मला संसदेत भेटतात, तेव्हा दादा, भैय्या म्हणून हाक मारतात. मी देखील अनेकदा त्यांच्याशी  बोलत असतो. काही गोष्टींच्या बाबतीत त्यांना समजावत असतो. पण धमकी वगैरे देण्याचा प्रश्नच येत नाही. उलट त्याच लोकांना धमक्या देत असतात. त्यांना राईचा पर्वत करण्याची सवयच आहे. मागच्या एक वर्षातली त्यांची लोकसभेतली भाषणं बघा. विशेषत: महाराष्ट्र सरकार व शिवसेनेविरोधात त्यांची बोलण्याची पद्धत, शब्द बघा. तुमच्या लक्षात येईल,' असं सावंत म्हणाले. 'राणा  यांच्याविरोधात शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळं त्यांचा शिवसेनेवर राग आहे. त्या सतत शिवसेनेवर टीका करत असतात. लोकसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन व्यक्तिगत टिप्पणी करत असतात. मी त्यांना त्याबद्दलही अनेकदा समजावलेय. मात्र, त्यांना धमकी कधीच दिली नाही. माझी ती भाषाही नाही. संसदेच्या लॉबीत मी त्यांना धमकी दिली असं त्यांचं म्हणणं असेल तर किमान आजूबाजूच्या लोकांना तरी माहीत असेल,' असं सावंत यांनी म्हटलं आहे.

 'चेहऱ्यावर अॅसिड फेकून तुझा चेहरा विद्रूप करेन असं कोणी त्यांना बोललं असेल मी स्वत: या गोष्टीचा निषेध करतो. ही अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे. अशी धमकी कोणी त्यांना दिली असेल तर मी राणा यांच्या बाजूनं उभा राहीन,' अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या