लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
संगमनेर :-युपीएतील संभाव्य बदल आणि नेतृत्व या विषयावरील
वक्तव्यामुळे शिवसेनेचे प्रवक्ते संजय
राउत यांना काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष नाना
पटोले यांनी टोला लगावला होता. आता
माजी प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब
थोरात यांनीही राऊत यांना फटकारले
आहे. काँग्रेसशिवाय युपीए
पूर्ण होऊ शकत नाही आणि सोनीया
गांधी याच युपीएच्या नेत्या असतील.
राऊत काय म्हणतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशा शब्दांत थोरात यांनी राऊत
यांना सुनावले आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. यानिमित्त
संगमनेरमध्ये झालेल्या आंदोलनात थोरात सहभागी झाले होते. त्यावेळी
प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी इतरही विषयांवर संवाद साधला. युपीए संबंधी राऊत
यांच्या वक्तव्याबाबत थोरात म्हणाले, 'काँग्रेस असल्याशिवाय युपीए पूर्ण होऊ शकत नाही. काँग्रेस हा राष्ट्रीय
पक्ष आहे. काँग्रेसने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. सध्या कठीण दिवस असतीलही पण एक ना
एक दिवस काँग्रेसचाच येणार आहे. देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता काँग्रेसच्या
नेतृत्वात आहे. युपीएचे नेतृत्वसुद्धा सोनिया गांधीच करतील. यासंबंधी राऊत काय
म्हणतात यावर नेतृत्व ठरणार नाही. देशात अनेक नेते आहेत, काँग्रेस
हा देशव्यापी पक्ष आहे. हे सर्व नेते ठरवतील तो निर्णय होईल. त्यामुळे राऊत काय
म्हणतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही.'
मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली
स्फोटके, पोलीस
अधिकाऱ्यांच्या बदल्या, गृहमंत्र्यावर झालेले आरोप यासंबंधी
बोलताना थोरात म्हणाले, 'सरकार या प्रकरणात कोणालाही पाठीशी
घालत नाही. यामुळे सरकार अडचणीत येईल, असे मला तरी वाटत
नाही. गृहमंत्र्यांवरही आरोप झाले. त्यांनी स्वत:च चौकशीची मागणी केली आहे.
त्यामुळे यामागील सत्य काय आहे, हे लवकरच समोर येईल. हा एक
कटकारस्थानाचा भाग असून याला बळी पडून काही अधिकारी आरोप करीत आहेत का, हेही चौकशीत स्पष्ट होईल. रश्मी शुक्ला यांच्या अहवालाची वस्तुस्थिती
मुख्य सचिवांनी केलेल्या चौकशीतून उघड झालीच आहे. मुख्य सचिव कोणी राजकीय व्यक्ती
नाही. त्यांनी केलेल्या चौकशीतून पुढे आलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवलाच पाहिजे.'
0 टिप्पण्या