लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अ. नगर: भाजपचे ज्येष्ठ नेते राधा राधाक्रुष्ण
विखे पाटील यांच्या उपस्थितीत श्रीरामपुर येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात
नियमभंग झाला काय, याची चौकशी करून पुढील कार्यवाही
करावी, असा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिला
आहे. त्यानुसार श्रीरामपूर पोलिस चौकशी करीत असल्याचे सांगण्यात आले.
विखे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी श्रीरामपूर पंचायत समितीच्या
कार्यकर्त्यांचा मेळावा आणि त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये गर्दी
जमल्याने करोना प्रतिबंधक नियमांचा भंग झाल्याची चर्चा
सुरू होती. पोलीस अधीक्षक पाटील आज श्रीरामपूरमध्ये होते. त्यावेळी पत्रकारांनी
त्यांना यासंबंधी प्रश्न विचारला. करोना संसर्ग टाळण्यासाठी लग्न, मेळावे आणि अन्य गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी आहे. असे असूनही हा
कार्यक्रम कसा झाला, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर
पाटील यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचा आदेश श्रीरामपूर पोलिसांना दिला.
श्रीरामपूर पोलीस ठाण्यात त्यानंतर
सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. याप्रकरणी चौकशी करून, माहिती घेऊन कारवाई करण्यात येणार
असल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी (१२ मार्च) विखे श्रीरामपूरमध्ये आढावा
बैठकीसाठी गेले होते. बैठकीनंतर श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावरील अनमोल रसंती
सभागृहात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यासाठी
श्रीरामपूर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यात भाषण करताना विखे
यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. यासोबतच श्रीरामपूर
तालुक्याच्या आमदारांवरही टीका केली होती. लोक महाविकास आघाडी सरकारला कंटाळले
असून भाजपला प्रतिसाद वाढत आहेत. त्यामुळे पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत
कार्यकर्त्यांनी नियोजनपूर्वक तयारी करावी, असे आवाहनही
त्यांनी केले होते.
नगर जिल्ह्यात आणि श्रीरामपूर तालुक्यातही करोनाचे रुग्ण वाढत
आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक रस्त्यावर उतरून कारवाई करीत आहेत.
अनेक ठिकाणी लग्न समारंभांवरही कारवाई झाली आहे. त्यामुळे राजकीय मेळाव्यांवर काय
कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
पोलीस अधीक्षक पाटील यांच्या आदेशानंतर पोलिसांनी चौकशी करण्यास सुरवात केली
असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अद्याप या प्रकरणी कोणतीही
कारवाई झालेली नाही.
0 टिप्पण्या