Ticker

6/Breaking/ticker-posts

काँग्रेसचे राष्ट्रवादीला आव्हान; आमदार, महापौरपदावर ठोकला दावा; ना. थोरात यानी भरली कार्यकर्त्यांच्या शिडात हवा..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 नगर: नगरच्या महापालिकेत मित्रपक्षाला दगा देऊन भाजपसोबत युती केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसविरूद्ध आता काँग्रेसने संघर्ष पुकारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणारे आमदारपद आणि राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपने मिळविलेले महापौरपद या दोन्हींवरही काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी दावा केला. संघटनात्मक घोडदौड अशीच कायम ठेवली, तर हे दिवस नक्की येतील, असे म्हणत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही कार्यकर्त्यांच्या शिडात हवा भरली.

शहर जिल्हा काँग्रेची संघटनात्मक आढावा बैठक थोरात यांच्या उपस्थितीत झाली. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे होते. यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांविरोधात रोष व्यक्त केला. महापालिकेत भाजपला साथ देणारे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे या सर्वांचा रोख होता. यावेळी बोलताना काळे यांनी थोरात यांच्या समोरच महानगरपालिकेतील भाजप-राष्ट्रवादी युतीवर सडकून टीका केली. राज्यात महाविकास आघाडी एकत्र असताना शहरात मात्र चुकीच्या पद्धतीने मित्रपक्ष वागत आहे. काँग्रेस शहरामध्ये त्यामुळे विरोधी बाकावर असून नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी आक्रमक भूमिका घेत असल्याचे यावेळी काळे यांनी सांगितले. ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी माजी आमदार असिर सर यांच्या नंतर नगरमधून काँग्रेसच्या वतीने विधानसभेमध्ये जाण्याची क्षमता असणारा चेहरा म्हणून काळे यांच्याकडे नगर शहर पाहत असल्याचे म्हटले.

हाच धागा पकडत ना. थोरात यांनी कार्यकर्त्यांच्या या विचाराला आणखी बळ दिले. ते, काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठरवले तर ही गोष्ट अशक्य नाही. काँग्रेस हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. धर्मनिरपेक्षता हा काँग्रेसचा शास्वत विचार आहे. नगर शहरामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा मतदार आहे. शहरामध्ये पक्षाची सुरू असणारी संघटनात्मक घोडदौड अशीच कायम राहिली तर वेळप्रसंगी नगर शहराचा महापौर देखील काँग्रेसचा होईल. मी आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. शहरातल्या विविध घटकांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व ताकद उभी केली जाईल. असा आशावाद त्यानी जागविला

यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, ज्ञानदेव वाफारे, दीप चव्हाण, राजेंद्र नागवडे, संपतराव म्हस्के, फारुख शेख, उपाध्यक्ष खलिल सय्यद, सरचिटणीस नलिनी गायकवाड, विद्यार्थी काँग्रेसचे जाहीद शेख उपस्थित होते.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यापूर्वी नगरच्या महापालिकेते राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपची सत्ता आहे. तर सर्वांत मोठा पक्ष असलेला शिवसेना विरोधात आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर यात दुरूस्ती होऊन राष्ट्रवादीचे नेते भाजपची साथ सोडून शिवसेनेला सोबत घेतील, अशी अपेक्षा शिवसेनेकडून व्यक्त होत होती. त्यासाठी वरिष्ठ पातळीपर्यंत पाठपुरावा करण्यात आला. मात्र, महापौरपद दूरच स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्यावेळीही शिवसेनेला दोनदा आपला उमेदवार मागे घ्यावा लागला. शिवसेनेनंतर आता काँग्रेसने यामध्ये लक्ष घालून मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या सोबत संघर्ष पुकारल्याचे दिसून येते. थोरात यांच्या उपस्थितीत यावर चर्चा झाल्याने याला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या