लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
मुंबई: 'सत्ता गेली की अक्कल जाते,
अक्कल गेली की भांडवल जाते, भांडवल गेले की
कुंपणावरचे कावळे उडून जातात. याचा अनुभव सध्या भाजप घेत आहे. सांगली-जळगावातील
करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी आहे. यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील,' असा सणसणीत टोला शिवसेनेनं भाजपला हाणला आहे.
सांगली पाठोपाठ जळगाव महापालिकेची सत्ता भाजपनं गमावली आहे.
भाजपचे नगरसेवक फुटल्यानं हे सत्तापरिवर्तन झाले आहे. ' सामना'च्या
अग्रलेखात या निकालांवर भाष्य करताना शिवसेनेनं भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. '
भाजपचा फुगा एकापाठोपाठ एक फुटू लागला आहे. महाराष्ट्रात भाजपला
तात्पुरती सूज मधल्या काळात आली होती. ही सूज म्हणजे पक्षाची वाढ आहे असा गैरसमज
काही मंडळीनी करून घेतला. त्यातून अहंकाराचे वारे भाजप नेत्यांच्या कानात शिरले.
त्या अहंकाराचा पाडाव जळगावात झाला,' असं निरीक्षण शिवसेनेनं
नोंदवलं आहे.
एकनाथ खडसे यांनी त्यांच्या राजकारणाची, तसेच जळगाववरील
वर्चस्वाची चुणूक दाखवली आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं खडसेंचं
कौतुकही केलं आहे. ' महाराष्ट्रात भाजपची सत्ता पाच
वर्षे होती. त्या सत्तेतून पैसा व पैशांतून सर्व स्तरांवरील सत्ता विकत घेण्यात
आल्या. पैसे फेकले की सर्व विकत मिळते हा नवा सिद्धांत भाजपनं रुजवला. पण
महाराष्ट्रात १०५ आमदार निवडून येऊनही भाजपला राज्याची सत्ता मिळवता आली नाही.
सत्ता गेली की अक्कल जाते, अक्कल गेली की भांडवल जाते,
भांडवल गेले की कुंपणावरचे कावळे उडून जातात. याचा अनुभव सध्या भाजप
घेत आहे. त्यातून त्यांना शहाणपण आले तर उत्तमच,' असा चिमटा
शिवसेनेनं काढला आहे
0 टिप्पण्या