Ticker

6/Breaking/ticker-posts

सचिन वाझे प्रकरणामुळे शरद पवार नाराज; दिल्लीहून तातडीने निघाले..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: हिरेन मनसुख प्रकरणात गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे आणि एकंदरच याप्रकरणाच्या हाताळणीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार प्रचंड नाराज असल्याचे समजते. त्यासाठी शरद पवार बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेणार आहेत. काहीवेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतर आता शरद पवार दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी निघाले आहेत. मुंबईत आल्यानंतर संध्याकाळी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटतील. या भेटीदरम्यान मनसुख हिरेन प्रकरण आणि त्यामधील सचिन वाझे यांचा कथित सहभाग या दोन गोष्टींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे सरकारकडून हे संपूर्ण प्रकरण ज्या ढिसाळपणे हाताळले गेले आहे त्यामुळे शरद पवार प्रचंड व्यथित झाले आहेत. शिवसेनेशी संबंधित असलेल्या सचिन वाझे यांना राजकीय संरक्षण दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेनेच्या आग्रहामुळेच सचिन वाझे यांना पोलीस दलाच्या सेवेत पुन्हा सामावून घेण्यात आले होते. मात्र, आता हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणातील आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सभागृहात विरोधकांच्या हल्ल्याला तोंड द्यावे लागत आहे. या सगळ्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिमेला बसत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकदाही सभागृहात फिरकले नाहीत. या सगळ्यामुळे शरद पवार प्रचंड नाराज असल्याचे समजते. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भेटीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ठाकरे सरकार पुन्हा बॅकफुटवर, वाझेंना क्राईम ब्रॅचमधून हटवलं

हिरेन मनुसख प्रकरणात विरोधकांच्या सभागृहातील गदारोळानंतर राज्य सरकारने सचिन वाझे यांनी बुधवारी विधानपरिषदेत यासंदर्भातील घोषणा केली. विरोधकांनी मागणी केल्याप्रमाणे आम्ही सचिन वझे यांना हिरेन मनसुख प्रकरणाच्या तपासावरून आणि गुन्हे शाखेतून हलवण्याचा निर्णय घेतल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

मनसुख हिरेन प्रकरणात विमल हिरेन यांनी दिलेल्या जबाबानुसार तपास सुरु आहे. विरोधकांकडे काही पुरावे, सीडी किंवा सीडीआर असतील तर त्यांनी एटीएसकडे द्यावेत. एटीएस याबाबत कोणालाही पाठिशी घालणार नाही. सचिन वझे किंवा कोणाचाही जावई असो, त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असे आश्वासन अनिल देशमुख यांनी दिले.

मात्र, अनिल देशमुख यांच्या या घोषणेनंतर भाजप आमदार प्रविण दरेकर आणि भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. आम्ही फक्त सचिन वाझेंच्या बदलीवर समाधानी नाही. त्यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे. अन्यथा आम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या