आखेगाव येथील घटना ; क्रूरकर्मा बाप पसार
दुर्दवी मुलगा -सोमनाथ करपे
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगाव : दारुड्या बापाने नशेत आपल्या पोटच्या मुलाचा डोक्यात लोखंडी गज घालून खून केल्याची खळबळजनक घटना आखेगाव (ता.शेवगाव) येथे मंगळवारी (दिं.३०) पहाटे घडली. पत्नी ताराबाई करपे हिने मुलाच्या हत्येबाबत आपल्या पतीविरुद्ध पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे आखेगाव परिसर हादरला आहे. मात्र,घटनेनंतर दारुड्या बाप पसार होण्यात यशस्वी झाला.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आखेगाव येथील गोरख किसन करपे या जन्मदात्या बापाने सोमनाथ करपे (वय १८) या बारावीत शिकणाऱ्या आपल्या तरण्याबांड मुलाचा लोखंडी गजाने मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास शेतात ऊसाला पाणी देत असताना खून केला. पत्नी ताराबाई हिने दारुच्या आहारी गेलेल्या आपल्या नवऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
आपला पती गोरख अनेक दिवसापासून दारूच्या आहारी गेल्याने घरात कायम किरकोळ स्वरूपाचे वाद होत होते,असे ताराबाई करपे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. सोमवारी (दिं.२९ रोजी) तो दारू पिऊन घरी आला. सांयकाळी आपण शेतातून घरी आल्यानंतर आज होळीचा सण असुनही तुम्ही सनासुदीचे दारू का पिवून आलात ? असे विचारले. यावर रागावलेला पती आपल्याला मारण्याकरीता पुढे आला.पंरतु, मुलगा सोमनाथ मध्ये आल्याने आपला मार वाचला. त्यावेळी गोरखने मुलाला शिवीगाळ केली व तो घरातून निघून गेला.
त्यानंतर ताराबाई व मुलगा सोमनाथ हे दोघे जेवण करुन रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आखेगाव शिवारातील गट नं.३२४ या त्यांच्या शेतातील ऊसाला पाणी देण्यासाठी गेले. त्यांच्याबरोबर ताराबाईची जाऊ मुक्ता ही देखील भाऊसाहेब करपे यांच्या पिकाला पाणी देण्यास आली होती. सोमनाथ हा ऊसाला पाणी देत होता.तर, त्याची आई ताराबाई ऊसाच्या शेवटच्या टोकाला पाणी पोहचल्याचे त्याला आवाज देऊन सांगत होती. त्यांच्यात साधारण १०० फुटाचे अंतर होते. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोमनाथच्या ओरडल्याचा आवाज आल्याने ताराबाई पळत त्याच्याकडे गेली,त्यावेळी गोरख हा मुलास डोक्यावर लोखंडी गजाने मारत असल्याचे तिने पाहिले. वर्मी घाव लागल्याने सोमनाथ बांधावर कोसळला. अति रक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना समजल्याने शेजारीच पिकाला पाणी देत असलेले मुक्ता करपे, अंबादास जाधव, सतिश पायघन हे घटनास्थळी धावले. त्यांनी जखमी सोमनाथला नगर येथे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र, औषधोपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात ताराबाई करपे यांनी आपल्या पतीविरूध्द फिर्याद दिल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे करीत आहेत.
0 टिप्पण्या