Ticker

6/Breaking/ticker-posts

दिलासा ; तीन आठवड्यानंतर पेट्रोल-डिझेल दरात किंचित कपात

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव कमी होत असल्याने अखेर आज पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात कपात केली आहे. आज तब्बल तीन आठवड्यानंतर इंधन दरात कपात करण्यात आली आहे. आज देशभरात पेट्रोल १८ पैसे आणि डिझेल १७ पैशानी स्वस्त झाले आहे.

इंधनावर कराचा बोजा सर्वाधिक आहे. त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कार्यकक्षेत आणण्याचे संकेत कालच मंगळवार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दिले होते. आगामी जीएसटी परिषदेच्या बैठकीत यावर चर्चा केली जाईल, अशी ग्वाही सीतारामन यांनी सभागृहाला दिली होती आणि आज कंपन्यांनी २४ दिवसानंतर इंधन दरात कपात करण्याचा निर्णय घेतला.

आज पेट्रोल १८ पैसे तर डिझेलमध्ये १७ पैसे कपात करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला आहे. आजच्या दर कपातीने मुंबईत पेट्रोलचा भाव ९७.४० रुपये झाला आहे. तर डिझेलचा भाव ८८.४२ रुपये झाला आहे. त्याआधी सलग २४ दिवस मुंबईत पेट्रोल ९७.५७ रुपयांवर आणि डिझेल ८८.६० रुपये होते. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.९९ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८१.३० रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.९५ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.२९ रुपये भाव आहे.

आज बुधवारी कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९१.१८ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८४.१८ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९४.०४ रुपये असून डिझेल ८६.२१ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.५८ रुपयांचा विक्रमी दर आहे.

मागील दोन आठवड्यात जागतिक बाजारात गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाचा भाव जवळपास १० ते १२ टक्क्यांनी कमी झाला आहे. त्याआधी ब्रेंट क्रूडचा भाव ७१ डॉलरवर गेला होता ज्यात मागील दोन आठवड्यात नफावसुली झाली आणि तेलाचा भाव ६४ डॉलरखाली घसरला आहे. सध्या जागतिक कमॉडिटी बाजारात डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ५९.३८ डॉलर इतका खाली आला होता. ब्रेंट क्रूडचा भाव ६२.२६ डॉलर झाला होता. मंगळवारी डब्ल्यूटीआय तेलाचा भाव ६१.५४ डॉलर प्रती बॅरल होता. तर ब्रेंट क्रूडचा भाव ६४.६५ डॉलर प्रती बॅरल होता.

वस्तू आणि सेवा कर कक्षेत पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्याची मागणी जीएसटी लागू झाल्यापासून होत आहे. मात्र जीएसटी लागू होऊन चार वर्षे उलटली तरी अद्याप यावर निर्णय झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र आणि राज्य सरकारचा करांचा बोजा असल्याने ग्राहकांना सध्या उच्चांकी किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे दुहेरी कर पद्धतीवर टीका करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या