लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
अहमदनगर:- नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा कहर वाढत आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात
नव्या ६६० रुग्णांची भर पडली. दुसऱ्या टप्प्यातील एका दिवसातील रुग्णसंख्येचा हा
नवा उच्चांक आहे. त्यामुळे आता प्रशासन सर्तक झाले असून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र
भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आढावा दौऱ्यावर बाहेर पडले आहेत. आकडे असेच वाढत
राहिल्यास रविवारनंतर कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत प्रशासन असल्याचे सांगण्यात
येते.
मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच जिल्ह्यात करोना रुग्णांचे
आकडे वाढत आहेत. कमी होण्याऐवजी त्यात सातत्याने वाढच होत आहे. नव्याने आढळणारे
रुग्ण आणि उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे ९४
टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. करोना प्रतिबंधासाठी अनेक उपययोजना लागू केलेल्या
असल्या तरीही आकडे वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. त्यामुळे
रविवारी एमपीएससीची परीक्षा झाल्यानंतर कठोर निर्णय घेण्याचा विचार प्रशासनाकडून
सुरू असल्याचे समजले.
जिल्ह्यात नगर शहरात सर्वाधिक रुग्ण वाढत आहेत. गेल्या चोवीस
तासांत आढळून आलेल्या नव्या ६६० रुग्णांपैकी २३८ रुग्ण नगर शहरातील आहेत. त्यामुळे
महापालिकेने खबरदारीचे उपाय हाती घेतले आहेत. ज्या भागात जास्त रुग्ण आढळून येत
आहेत, तेथे मायक्रो कंटेन्मेंट झोन
जाहीर करण्यात येत आहेत. शहरात आतापर्यंत १९ ठिकाणी असे झोन करण्यात आले आहेत.
तेथे नियमानुसार सर्व निर्बंध कडक करण्यात आले आहेत.
ग्रामीण भागातही रुग्ण वाढत आहेत. राहाता ७७, संगमनेर ५७,
कोपरगाव ३५, नेवासे ३१, पाथर्डी
३१, राहुरी २७, नगर तालुका २६, श्रीरामपूर २३, कर्जत २२, पारनेर
१९, भिंगार शहर १८ अशी गेल्या २४ तासांतील रुग्ण संख्या आहे.
जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि मुख्य
कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर ठिकठिकाणी दौरा करून आढावा घेत आहेत. सरकारी
प्रयोगशाळांपेक्षा खासगी ठिकाणाहून येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यावरही
लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात सध्या दिवसा जमावबंदी,
रात्रीची संचारबंदी लागू आहे. मात्र, शाळा-महाविद्यालयांसह
सर्व व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी आहे. विवाह आणि अन्य कार्यक्रमांवर बंधने
आहेत. असे असूनही संख्या कमी होत नसल्याने सर्वांच्या चिंतेत भर पडली असून आता
प्रशासन काय पावले उचलते, याकडे लक्ष लागले आहे. मागील रविवारी
होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा येत्या रविवारी होत आहे. प्रशासन सध्या त्याच्या
तयारीत व्यस्त आहे. शिवाय ती परीक्षा सुरळीत पार पाडण्यावर भर आहे. त्यामुळे जे
काही निर्णय घ्यायचे असतील, ते रविवारनंतरच होण्याची शक्यता
आहे.
0 टिप्पण्या