सीताराम गायकर यांची राष्ट्रवादीत घरवापसी..
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे समर्थक सीताराम गायकर यांनी पुन्हा राष्ट्रवादीचा
झेंडा हाती धरला. आमचं सरकार नसतं, तर तुम्ही पक्षात आला
असता की नाही, हे माहिती नाही, असे
शालजोडीत लगावून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गायकरांचे स्वागत
केले. गायकर हे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकचे माजी चेअरमन आहेत
“ आमचं सरकार
नसतं, तर तुम्ही पक्षात आला असतात की नाही, हे माहिती नाही. मी याच ठिकाणी बसलो होतो. त्यावेळी कोणी थांबायला तयार
नव्हतं. मधुकर पिचड यांनी पक्ष का सोडला, हे अजूनही मला कळत
नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांचा अनेक पक्षातील नेत्यांना आदर
आहे. अनेक जणांना आपल्या पक्षात यायचं आहे. राष्ट्रवादी हा काम करणाऱ्या
कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे ” असं जयंत पाटील म्हणाले.
गायकरांचं धोतर फेडण्याची दादांची भाषा
2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे
जहाज बुडणार, असा अंदाज बांधून भाजपमध्ये उड्या मारणाऱ्या
नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड आणि सीताराम गायकर यांचा
समावेश होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या
सीताराम गायकर यांचं धोतर फेडण्याची भाषा केली होती. त्यानंतर या निवडणुकीत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. किरण लहामटे यांनी गायकर यांचा पराभवही केला होता.
पवारांच्या
पाठिंब्याने गायकर जिल्हा बँकेवर
काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या पाठिंब्याने अहमदनगर जिल्हा
बँकेच्या निवडणुकीत सीताराम गायकर हे बिनविरोध निवडून आले होते. तेव्हापासूनच
सीताराम गायकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करणार, अशी चर्चा रंगली होती. अखेर हा अंदाज खरा ठरला आहे. सीताराम गायकर
यांच्यासह अगस्ती ग्रामीण पतसंस्थेच्या 9 सदस्यांनीही
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
सीताराम गायकर यांच्या मदतीने अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणुकीत
मधुकर पिचड यांना धक्का देण्याची राष्ट्रवादीची रणनीती आहे. लवकरच या कारखान्याची
निवडणूक होणार आहे.
थोड्क्यात सीताराम गायकर..
* सीताराम गायकर हे मूळचे ऊस तोड कामगार
* मेगरस येथे दूध संकलन केंद्राची सुरूवात
* अमृत सागर दूध संघाचे संचालक
* 1995 मध्ये मधुकर पिचड यांच्याविरोधात बंड करत तिसऱ्या आघाडी
स्थापन केली. मात्र, तिसरी आघाडी सपशेल फोल ठरली.
* अशोक भांगरेंचा मधुकर
पिचडांनी 35 हजाराच्या फरकाने त्यावेळी पराभव केला होता.
निवडणुकानंतर काही दिवस पुन्हा पिचडांसोबत आले. अगस्ती ग्रामीण दूध संघाचे संचालक
झाले. नंतर दूध संघाच्या चेअरमनपदी वर्णी लागली.
* 1988 साली अगस्ती सागर कारखान्याची स्थापना झाली. त्यात सीताराम
गायकर संचालक झाले.
* अकोले तालुका एज्युकेशन
विश्वस्त संचालक
* अगस्ती ग्रामीण पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष
* मधुकर पिचड यांच्या आशीर्वादाने अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद.
अध्यक्षपदाची कारकीर्द वादग्रस्त राहिली. कर्मचारी भरतीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप.
* मधुकर पिचड यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश
0 टिप्पण्या