Ticker

6/Breaking/ticker-posts

महिलेचा हत्यारा श्वानामुळे अवघ्या दोन तासात पोलिसांच्या जाळ्यात

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

संगमनेर :-एखादा गुन्हा घडला की श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले जाते. मात्र, गुन्हेगारांकडून आधुनिक साधनांचा वापर होत असल्याने यातून पोलिसांच्या हाती फारसे काही लागत नाही.  संगमनेर तालुक्यात मात्र पोलिसांना एका महिलेचा खुनी शोधण्यात याच मार्गाने यश आले आहे. विशेष म्हणजे तपास सुरू असताना आरोपीही तेथेच वावरत होता. पोलिसांच्या रक्षा नावाच्या श्वानाने वासाने आरोपीला ओळखले आणि त्याच्या अंगावर भुंकू लागली आणि आरोपी अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

संगमनेर तालुक्यातील मल्हारवाडी शिवारात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. संगमनेर तालुका पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तेथे महिलेची ओळख पटणेही शक्य नव्हते, तर खुनी कसा शोधणार? पोलिसांनी सुरवातीपासून प्रयत्न केले. तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पथक रक्षा नावाच्या श्वानाला घेऊन आले. घटनास्थळावरील काही वस्तूंचा रक्षाला वास देण्यात आला. त्यानंतर रक्षाने आपले काम सुरू केले. पोलिसांचा तपास पाहण्यासाठी ग्रामस्थ जमले होतेच. तेथे उपस्थित असलेल्या राजू शंकर कातोरे (रा. मल्हारवाडी, कऱ्हे, ता. संगमनेर) याच्याजवळ जाऊन रक्षा जोरजोराने भुंकू लागली. हाच तो आरोपी आहे, असा श्वानांचा इशारा असतो. पोलिसांनी तो ओळखला. कातोरे याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली.

मृत महिलेचे नाव मंगला वामन पथवे (वय ४५, रा. उंचखडक, ता. अकोले) असल्याचे चौकशीतून पुढे आले. आरोपी कातोरे याच्यासोबत या महिलेने एका शेतावर वाटणीने काम घेतले होते. त्याच्याशी संबंधित वादातूनच कातोरेने तिचा खून केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. कातोरे हा व्यसनी आहे. शेतावरचे काम दोघांनी मिळून घेतले असले तरी तो दारुच्या नशेत फिरत असे आणि मंगला हिलाच काम करावे लागत असे. त्यावरून त्यांच्यात वाद होत होते. सोमवारी त्यांच्यात असाच वाद झाला. त्यावेळी कातोरे याने तिला मारहाण करून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह शेजारच्या शेतात नेऊन टाकला. 

आपल्यावर हे प्रकरण येऊ नये यासाठी त्यानेच पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलीस आल्यावर तो तेथेच थांबून होता. आपण पकडले जाऊ असे, त्याला वाटलचे नव्हते. शेवटी श्वानपथकाच्या मदतीने आरोपी पकडला गेला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून कातोरेला अटक केली. अवघ्या दोन तासांतच खुनाचा गुन्हा उघड झाला. श्वानपथक आणि पोलिसांचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या