Ticker

6/Breaking/ticker-posts

बारामतीत डिपॉझिट जप्त, तरीही मी आमदार ; समाधान आवताडेही होईल : गोपीचंद पडळकर


 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पंढरपूर : “बारामतीत डिपॉझिट जप्त झाल्यावर कुणी तिकीट देईल का, पण मला दिलं. माझी आमदार होण्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली. तशीच इच्छा समाधान आवताडेंची आहे, त्यांची इच्छाही पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत पूर्ण होईल”, असा विश्वास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला. ते पंढरपुरात बोलत होते. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने इथे पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडे भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात भाजपने समाधान आवताडे  यांना मैदानात उतरवलं आहे. या दोन्ही उमेदवारांचे अर्ज आज दाखल करण्यात आले. समाधान आवताडेंच्या पहिल्या प्रचार सभेदरम्यान भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपचे फायरब्रँड नेते गोपीचंद पडळकर यांनी जोशपूर्ण भाषण केलं.

ही निवडणूक भारत नानांविरोधात नाही

पडळकर म्हणाले, ‘ही निवडणूक भारतनाना भालके किंवा त्यांच्या कुटुंबाविरोधात नाही. ही निवडणूक शेतकरी, कष्टकरी जनतेला फसवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात आहे. ज्यांनी 100 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट ठेवलं, अशा भ्रष्ट सरकारविरोधात आहे. भारत नानांना शांती मिळायची असेल, तर मविआ सरकारविरोधात मतदान करा

डिपॉझिट जप्त होऊनही मी आमदार

बारामतीत डिपॉझिट जप्त झाल्यावर कुणी तिकीट देईल का, पण मला दिलं. मला चंद्रकांतदादा आणि देवेंद्र फडणवीसांनी आमदार केलं. मी तीन निवडणुका लढवल्या, तिन्ही हरलो. लोकसभेलाही हरलो. बारामतीत माझं डिपॉझिट जप्त झालं. पण माझी आमदार होण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळेच मला आमदारकी मिळाली. पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान आवताडेंचीही तशीच इच्छा आहे. त्यांनाही आमदार व्हायचं आहे. मला खात्री आहे, पंढरपूरच्या या भूमीत यावेळी त्यांची ही इच्छा पूर्ण होईल, असं गोपीचंद पडळकर यांनी नमूद केलं.

बारामती विधानसभेचा निकाल काय होता

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपचं बारामतीतील आव्हान मोडीत काढलं होतं भाजपने बारामतीतून अजित पवार यांच्याविरोधात गोपीचंद पडळकर यांना उतरवलं होतं. मात्र, अजित पवारांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह उर्वरित सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव केला. पडळकरांसह सर्वच उमेदवारांचं अगदी डिपॉझिट देखील जप्त झालं.  अजित पवार यांना एकूण 1 लाख 95 हजार 641 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना केवळ 30 हजार 376 मते मिळाली. अशाप्रकारे अजित पवार तब्बल 1,65,265 मताधिक्याने विजयी झाले.

भारत भालके यांचं निधनामुळे पोटनिवडणूक

पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं 28 नोव्हेंबर रोजी निधन झालं. ऑक्टोबरमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. पण त्यानंतर ते कोरोनामुक्तही झाले होते. मात्र, पुढे त्यांची प्रकृती ढासळत गेली. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता.

भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992  साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002  पासून त्यांना या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले आहे.

भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. 2009  साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भारत भालके हे जायंट किलर ठरले होते. 2019  साली माजी आमदार (कै.)  सुधाकर  परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या