देहदान चळवळ गतीमान झाल्यास अनेकांना नवजीवन मिळणार -जालिंदर बोरुडे
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर :- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने शहीद दिन देहदानाच्या संकल्पाने साजरा करण्यात आला. पत्रकार चौकातील शहीद भगतसिंह स्मारक येथे देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे शहीद भगतसिंह, सुखदेव व राजगुरु यांना अभिवादन करुन देहदानाच्या संकल्पाचे अर्ज भरुन घेण्यात आले. यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, रतन तुपविहीरे, अशोक मिसाळ, संजय भिंगारदिवे, सुखवेंदरसिंह जग्गड आदी उपस्थित होते.
जालिंदर बोरुडे म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद भगतसिंह, सुखदेव व राजगुरु यांनी बलिदान दिले. त्यांचे बलिदान न विसरता येणारे आहे. आजच्या युवकांनी या ज्वाजल्य देशभक्तीपासून प्रेरणा घेण्याची गरज असून, त्यांचे क्रांतीकारी पुरोगामी विचार हेच समाजाला दिशादर्शक आहे.
देहदान करणे ही काळाची गरज बनली आहे. गैरसमजुत व अंधश्रध्देमुळे भारतात अवयवदान करण्यास घाबरतात. नेत्रदानासह व देहदान चळवळ गतीमान करण्यासाठी जागृकता निर्माण करण्याची गरज आहे. ही चळवळ गतीमान झाल्यास अनेकांना नवजीवन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नागरिकांमध्ये देहदानाबद्दल जागृती करुन त्यांच्या संकल्पाचे अर्ज भरुन घेण्यात आले.
0 टिप्पण्या