लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात
आले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आलं असून त्यांची
प्रकृत्ती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचे
प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली.
पवारांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले
होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास
असल्याचं निदान झालं. त्यामुळे पवार यांना 31 मार्चला
रुग्णालयात अॅडमिट करण्यात येणार आहे. शरद पवारांवर एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया
केली जाईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. शरद पवारांच्या
प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
दरम्यान, पवार हे गेल्या आठवड्यात संसदेच्या कामकाजात भाग घेण्यासाठी दिल्लीत होते.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप केले
होते. त्यामुळे पवारांनी दिल्लीतील निवासस्थानी दोनदा पत्रकार परिषदा घेऊन
देशमुखांचा बचावही केला होता. दरम्यान, त्यांनी केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा होती. त्यामुळे राज्याच्या
राजकारणात एकच खळबळ उडाली होती.
सर्व कार्यक्रम रद्द
पवार हे
सध्या सुरु असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचारसभा घेणार होते. पश्चिम
बंगाल आणि केरळमध्ये त्यांचे प्रचार दौरे नियोजित होते. मात्र आता त्यांना
रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याने, पुढील सर्व
कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
नवाब मलिक नेमकं काय म्हणाले?
आमचे
अध्यक्ष शरद पवार साहेबांना थोडं अस्वस्थ वाटत होतं. काल संध्याकाळी त्यांच्या
पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना तपासणीसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात
आले. तिथे तपासण्या झाल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं.
शरद
पवारांना हा त्रास झाल्यामुळे त्यांना देण्यात येत असलेली रक्त पातळ करण्याची औषधं
थांबवण्यात आली आहेत. त्यांना 31 मार्च 2021 रोजी रुग्णालयात अॅडमिट करण्यात येणार आहे. तिथे त्यांची एण्डोस्कोपी आणि
शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्यामुळे पुढील नोटीसपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम
रद्द करण्यात आले आहेत.
रुग्णालयात दहा दिवस उपचार
खासदार
सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करून पवारांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. बाबांना
पित्ताशयाचा त्रास होत आहे. त्यामुळे त्याकडे तातडीने लक्ष देऊन उपचार करणे आवश्यक
आहे. म्हणूनच त्यांना बुधवार 31 मार्चला10 दिवसांसाठी रुग्णालयात अॅडमिट करण्यात येणार आहे. त्यानंतर ते घरीच
विश्रांती घेतील. त्यामुळे त्यांचे आजपासून सुरु होणारे नियोजित कार्यक्रम आणि
दौरे पुढील 2 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. तुम्ही
समजून घेतल्याबद्दल धन्यवाद, असं सुप्रिया यांनी म्हटलं आहे.
पवारांची प्रकृती स्थिर
राष्ट्रवादीच्या
नेत्या विद्या चव्हाण यांनी पवारांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं. पवारांना
नेमकं काय झालं हे मलाही माहीत नाही. मलिक यांचं ट्विट वाचल्यानंतर मला कळालं असून
मी पवार कुटुंबीयांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे, असं त्या म्हणाल्या.
0 टिप्पण्या