Ticker

6/Breaking/ticker-posts

वाझे यांच्या मर्सिडीज कारमध्ये सापडले घबाड..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

मुंबई: उद्योगपती मुकेश अम्बानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवण्यामागे नेमकं कोण होतं आणि त्याचा उद्देश काय होता याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता असून याप्रकरणी तपास करत असलेल्या एनआयए आज सचिन वाझे यांच्या वापरातील मर्सिडीज कार जप्त केली आहे. या कारच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुकेश अंबानी यांच्या अंन्टिलिया या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यात आल्या होत्या. ही कार तेव्हाच जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी सुरुवातीला तपास करणाऱ्या मुंबई क्राइम ब्रांचने या कारची झडती घेतली होती. त्यानंतर हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेने हाती घेतल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर तपासाला वेग आल्याचे दिसत आहे. स्कॉर्पिओसोबत एक इनोव्हा कार सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली होती. ती कार ताब्यात घेतल्यानंतर आज एनआयएने मर्सिडीज कार जप्त केली आहे. ही कार सचिन वाझे यांच्या वापरात होती, असे एनआयएकडून सांगण्यात आले आहे.

एनआयएच्या तपास पथकाने कारची झडती घेतली असता त्यात पाच लाखांपेक्षा अधिक रोख रक्कम, स्कॉर्पिओ कारच्या दोन नंबर प्लेटस आणि एक जोडी कपडे आढळल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले. ही कार सचिन वाझे चालवत होते. मात्र ही कार नेमकी कुणाची आहे, याचा तपास केला जाईल, असेही या अधिकाऱ्याने नमूद केले. मनसुख हिरन बेपत्ता होण्याआधी १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी या कारने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातून ठाण्यापर्यंत प्रवास केला होता व त्याआधी ते तिथे कुणाला तरी भेटले होते, अशी माहितीही एनआयएच्या हाती लागली आहे. अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ पार्क करण्यात आली त्या रात्री इनोव्हातून पीपीई किट घालून उतरलेली व्यक्ती सचिन वाझे होते व त्यांनी हे पीपीई किट नंतर जाळून टाकले, असा दावाही एनआयएच्या एका अधिकाऱ्याने केला आहे. या सगळ्या पुराव्यांची जुळवाजुळव केली जात असून त्यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, अटकेतील सचिन वाझे यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. एनआयएच्या कारवाईवर आक्षेप घेणार वाझे यांचे तीन अर्ज आज एनआयए कोर्टाने फेटाळून लावले आहेत. दुसरीकडे निलंबित वाझे जिथे सेवेत होते त्या क्राइम ब्रांचच्या क्राइम इंटेलिजन्स युनिट कार्यालयाची एनआयए टीमने झडती घेतली. तिथून काही कागदपत्रे जप्त करण्यात आली असून लॅपटॉप, आयपॅड, मोबाइलही तपासण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या