Ticker

6/Breaking/ticker-posts

महिलादिन : नगरच्या पहिल्या रिक्षाचालक नीलिमा खरारे यांचा गौरव

 महिला शिक्षिकांकडून शहरातील नगरच्या पहिल्या रिक्षाचालक नीलिमा खरारे यांचा हिरकणी पुरस्काराने गौरव




लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नगर - जागतिक महिला दिनानिमित्त येथील एवरेस्ट अ‍ॅबॅकस अ‍ॅकॅडमीच्या वतीने नगरमधील पहिल्या महिला रिक्षाचालक सौ. नीलिमा खरारे यांचा गौरव करून त्यांना ‘हिरकणी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अ‍ॅकॅडमीत फक्त महिला शिक्षिकाच काम करतात. महिला सबलीकरणाच्या उद्देशाने महिलांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी हा सन्मान करण्यात आला. कोविड-19च्या पार्श्‍वभूमीवर शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

नीलिमाताईंचा जन्म नगरमध्ये झाला. बालपणी आई-वडिलांचे छत्र हरपले. कसेबसे सातवीपर्यंत शिक्षण घेत भावडांची जबाबदारी पेलली. लग्नानंतर मिळेल ते काम करू लागल्या. डॉ. अनुपमा गाडेकर यांच्याशी ओळख झाल्यानंतर त्यांनी नीलिमाताईंचा प्रामाणिकपणा व मेहनती स्वभाव पाहून घर सांभाळण्याची जबाबदारी सोपवली. मात्र, आर्थिक चणचण भासू लागली. नंतर रितसर ड्रायव्हिंग स्कूलमधून प्रशिक्षण घेतले. लायसनसाठी आठवी पासची अट असल्याने दादा चौधरी रात्रशाळेत प्रवेश घेत आठवी पास होऊन लायसन मिळवले. त्यांना पती मनीष खरारे व डॉ. अनुपमा यांनी प्रेरणा दिली. यातूनच नगर शहराला त्यांच्या रूपाने पहिली महिला रिक्षाचालक लाभली. नियमांचे काटेकोर पालन करत महिला रिक्षाचालक नगरवासीयांना दिसू लागली. या गोष्टीची सवय नसल्याने लोक सुरूवातीला कुतुहलाने पाहू लागले, तर काही आपल्या मुलींना त्यांच्यापासून प्रेरणा देऊ लागले.

सत्कारास उत्तर देताना नीलिमा खरारे म्हणाल्या की, आता माझे छान सुरू आहे. ज्या कामापासून पायाभरणी झाली ते काम कधीही सोडणार नाही. डॉ. गाडेकर यांच्याबद्दल मला आदर आहे. बेरोजगार महिलांनी या व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांच्यावर रखुमाई नावाची डाक्युमेंटरी बनवली असून, त्यांच्या या कामाची दाखल घेत एवरेस्ट अ‍ॅबॅकस अ‍ॅकॅडमीने त्यांना हिरकणी पुरस्कार देऊन सन्मानित केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या