Ticker

6/Breaking/ticker-posts

बाळ बोठे : पोलिस कोठडीत 23 मार्चपर्यंत वाढ !

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पारनेर : -यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा हजारे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार, पत्रकार बाळ बोठे याच्या पोलिस कोठडीत पारनेर न्यायालयाने दि.23 मार्चपर्यंत वाढ केली आहे.सरकारी वकील व बोठे याचे वकील यांच्यात झालेल्या युक्तिवादानंतर पोलिस कोठडीत वाढ करण्याचे आदेश न्यायाधीश उमा बोऱ्हाडे यांनी दिले आहेत.

रेखा जरी यांच्या हत्याकांडानंतर सुमारे सव्वातीन महिने फरार असणाऱ्या बाळ बोठेच्या मुसक्या गेल्या शनिवारी पोलिस पथकाने हैदराबाद येथून आवळल्या होत्या. यानंतर त्याला 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती. आज या कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा पारनेरच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी तपासी अधिकारी,पोलिस उपाधीक्षक मनोज पाटील यांनी रिमांड रिपोर्ट वाचून दाखविला. यामध्ये बोठे वापरत असलेला आयपॅड, मोपेड गाडी हस्तगत करायचे आहे, तसेच या गुन्ह्यात व फरार होण्यात बोठे याला कोणी मदत केली, खून घडला त्या ठिकाणापासून ते नगरच्या सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत कोणी वॉच ठेवला, गुन्ह्याचे नेमके कारण काय तसेच या काळात बोठे याने कोणा-कोणाशी, कसा पत्रव्यवहार केला? हा तपास होणे बाकी असल्याचे तपासी अधिकारी मनोज पाटील यांनी न्यायालयासमोर मांडले. सरकारी वकील ॲड. मनीषा दुबे यांनीही सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडली.

बोठेचे वकील ॲड. महेश तवले अक्षय गोसावी यांनीही युक्तिवाद केला. न्यायालयासमोर बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणात दोषीचा सहभाग मर्यादित स्वरूपाचा आहे. प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभाग नव्हता, त्यांचा मोबाईल फोन यापूर्वीच जप्त करण्यात आलेला आहे. आता केवळ तपासात टेक्निकल बाबीच उरलेल्या असल्याने त्यांना पोलिस कोठडी देण्याची आवश्यकता नसल्याचे म्हणणे बोठे याच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडले. या दोन्ही युक्तिवादानंतर न्यायाधीश उमा बोऱ्हाडे यांनी बोठे याला पुन्हा 23 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या