Ticker

6/Breaking/ticker-posts

खासदार सुजय विखे यांचा ‘राजकीयदृष्ट्या धाडसी ’ संकल्प

 

लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर: पुढील निवडणुकीला सामोरे जाताना शेवटच्या वर्षांत लोकप्रतिनिधींकडून भूमिपूजनांच्या कार्यक्रमांचा धडका लावला जातो. आश्वासने देत निवडणूक लढविली जाते. मात्र, या परंपरेला छेद देणारा राजकीयदृष्ट्या धाडसी संकल्प केला आहे. नगरचे भाजपचे खासदार डॉ.  सुजय विखे पाटील यांनी.  शेवटच्या वर्षी एकाही कामाचे भूमिपूजन करायचे नाही.  जे काही कामे असतील ती ती पहिल्या चार वर्षांतच करून घ्यायची . भारतीय जनता पक्षाने दिलेल्या सूचनांनुसार प्रत्येक खासदार आपल्या मतदारसंघात पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल आणि आपल्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल माहिती देत आहेत. तशीच पत्रकार परिषद विखे पाटील यांनी आयोजित केली होती. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे आणि भाजपचे शहजिल्हाध्यक्ष भय्या गंधे उपस्थित होते.

 
विखे पाटील म्हणाले, ‘यावेळचा अर्थसंकल्प वेगळा आहे. करोनामुळे सगळे संदर्भ बदलले आहेत. तरीही अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्याचा फायदा आपल्या मतदारसंघाला कसा करून घ्यायचा, यासाठी प्रयत्न करणार आहे. नगर जिल्ह्यात रस्त्याची अनेक कामे मार्गी लागली आहेत. या कामांसाठी राज्य सरकारचे सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे होता होईल तेवढा केंद्रातून निधी आणून ही कामे मार्गी लावली आहेत.

 गेल्या निवडणुकीत आपण दिलेली बहुतांश आश्वासने पूर्णत्वाकडे आली आहेत. उरलेलीही मार्गी लावणार आहोत. मात्र, आपण ठरविले आहे की जी काही कामे करायची ती पहिल्या चार वर्षांतच करून घ्यायची. उगीच मतांचे गणित डोळ्यासमोर ठेवून शेवटच्या वर्षी देखावा करण्यासाठी भूमिपूजन करायचेच नाही. पुढील निवडणुकीला सामोरे जाताना मागील कामांचा हिशोब मांडून जायचे. आता मतदार हुशार झाले आहेत. त्यांना खोटी आश्वासने आणि कामाचा देखावा लगेच लक्षात येतो. जे करायचे मनापासून करायचे, असे आपण ठरविले आहे,’ असेही विखे पाटील म्हणाले.

 दर तीन महिन्याला केंद्रीय मंत्री

विखे पाटील म्हणाले की, ‘राज्य सरकारच्या निधीतून होऊ शकणारी कामेही रखडली आहेत. त्यासाठी आता आपण केंद्रीय निधीतून प्रयत्न करणार आहोत. यासाठी दर तीन महिन्याला एका केंद्रीय मंत्र्याला मतदारसंघात आणण्याचा आपला प्रयत्न आहे. एप्रिल महिन्यात मंत्री नितीन गडकरी आणि राजनाथसिंह यांच्यापासून याची सुरुवात होणार आहे. पुढील महिन्यात एका कार्यक्रमासाठी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही जिल्ह्यात निमंत्रित करण्यात आले आहे. मतदारसंघातील रस्त्याचे प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागले असून आता पाणी प्रश्नावर लक्ष केंद्रीत करणार आहोत,’ असेही विखे पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या