Ticker

6/Breaking/ticker-posts

'ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है' , सुप्रिया सुळेंची तुफान फटकेबाजी

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी मुंबई: शरद पवार यांना राजकारणात ५५ वर्षे झाली. त्यातली अर्धी वर्षे सत्तेत गेली तर अर्धी वर्षे विरोधात गेली. या ५५ वर्षांत महाराष्ट्रातील जनतेने शरद पवारांना कधी अंतर दिले नाही असे नमूद करतानाच सत्ता ही सेवा करण्यासाठी असते ती पदासाठी वा लालदिव्यासाठी नसते हे सदैव लक्षात ठेवा, असे आवाहन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यानी नवी मुंबई येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना नवी मुंबईत सत्ता परिवर्तन एक हजार एक टक्के होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. साताऱ्यात भर पावसात झालेल्या शरद पवार यांच्या सभेचा दाखला देत नवी मुंबईचा पुढचा महापौर महाविकास आघाडीचाच असेल, असेही सुप्रिया म्हणाल्या. भाजपच्या एका बड्या नेत्याने महाराष्ट्रात आमचा ओव्हर कॉन्फिडन्स आणि राष्ट्रवादीकडून केलेलं इनकमिंग नडल्याची कबुली दिल्याचा दावा करत सुप्रिया यांनी यावेळी जोरदार टोलेबाजी केली.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर यावेळी जोरदार शब्दांत त्यांनी निशाणा साधला. शरद पवारांना निवृत्त होण्याचा सल्ला देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी खिल्ली उडवली. मात्र, महाराष्ट्राला ते मान्य नव्हतं. त्यामुळेच 'एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा! महाराष्ट्र एक तरफ और देवेंद्र फडणवीस दूसरी तरफ', असे चित्र महाराष्ट्रात दिसले अशी टोलेबाजी सुप्रिया यांनी केली. फडणवीस म्हणतात म्हणून पवारसाहेब निवृत्त होतो असे म्हणतीलही पण महाराष्ट्राच्या मनात तसं नाहीय, असेही त्यांनी नमूद केले. नवी मुंबईकरांच्या मनात 'त्या' घोड्याची फिल्म छान झालीय. म्हणूनच 'ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है' असे माझे म्हणणे आहे. आपल्याला तो पिक्चर बघायचा आहे, असे सूचक विधानही सुप्रिया यांनी केले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या