लोकनेता न्यूज
ऑनलाईन
न्यूज नेटवर्क
नगर :अहमदनगर कॅन्टोमेंट बोर्ड पूर्ण बरखास्त करुन भिंगारला नगरपालिका स्थापन करावी, अशी मागणी कॅन्टोमेंट बोर्डचे भुतपूर्व व्हाईस प्रिसिडेंट अॅड.आर.आर.पिल्ले यांनी केली आहे. नगर कॅन्टोमेंट बोर्डच्या विद्यमान सदस्याचे अधिकार संपुष्टात येऊन बोर्डची सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत बोर्ड अध्यक्ष आणि प्रशासन बोर्डचा कारभार पाहावा, असा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे बोर्ड पूर्ण बरखास्त झाले नाही, असे नमूद करुन अॅड.पिल्ले यांनी भिंगारसह देशातील सर्वच कॅन्टोमेंट बोर्ड पूर्ण बरखास्त करुन त्यात्या ठिकाणी नगरपालिकेची स्थापना करावी, अशी मागणी करणारे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि खासदार डॉ.सुजय विखे पा. यांच्यासह संबंधित कॅन्टोमेंट बोर्डाच्या लोकसभा मतदार संघातील खासदारांना पाठविले आहे.
अहमदनगर कॅन्टोमेंट बोर्ड पूर्ण बरखास्त करुन भिंगारला नगरपालिका स्थापन करावी, अशी मागणी भिंगार काँग्रेस कमिटी गेल्या 50 वर्षांपासून सातत्याने करत आहे. आजपर्यंत या मागणीचा पाठपुरावा भिंगार काँग्रेसच पुढाकार घेऊन करत असून, भिंगार परिसराच्या विकासासाठी आता बोर्ड बरखास्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी भिंगारकरांचा अंत पाहू नये, असे निवेदनात म्हटले आहे.
भिंगार काँग्रेस कमिटीच्यावतीने कमिटीचे अध्यक्ष अॅड.पिल्ले यांच्यासह काँग्रेस सेवा दल महिला शहर जिल्हा अध्यक्ष सौ.अलकाताई बोर्डे, प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य शामराव वाघस्कर, सदस्य रिजवान शेख, महिला अध्यक्षा सौ.मार्गारेट जाधव, महिला काँग्रेस सेवा दल अध्यक्ष किरणताई आळकुटे, काँग्रेस सेवा दल अध्यक्ष संतोष फुलारी, अनिल परदेशी, अनिल वराडे, अॅड.साहेबराव चौधरी, रमेश त्रिमुखे, जालिंदर आळकुटे, नवनाथ वेताळ, संजय छत्तीसे, संतोष धीवर, संतोष कोलते, संजय खडके, संजय झोडगे, निजाम पठाण, दिपक लोखंडे, राहुल काळे, सुभाष त्रिमुखे, संतोष कांबळे, लक्ष्मण साखरे, सौ.मंदाकिनी हौडगे, फिरोज खान (सर), सोपान साळूंके आदिंच्या सह्या या निवेदनावर आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सन 1978 मध्ये देशाचे सरसेनापती कै.अरुण वैद्य अहमदनगर कॅन्टोमेंट बोर्डचे अध्यक्ष असतांना कॅन्टोमेंटबोर्ड पूर्ण बरखास्त करण्याचा ठराव मंजूर करुन केंद्र सरकारला पाठविला होता, त्यात सदर बाजारसहीत भिंगारला स्वतंत्र नगर पालिका स्थापन करावी, असा तो ठराव होता. त्यानंतर सन 1991 मध्ये खा.शरद पवार संरक्षण मंत्री असतांना अॅड.पिल्ले त्यावेळी कॅन्टों.बोर्डचे उपाध्यक्ष होते. त्यावेळचे खासदार यशवंंतराव गडाख पा. त्यांच्यामार्फत दिल्ली येथे कॅन्टों.बोर्डाच्या विकासाबाबत अधिकृत बैठक आयोजित केली होती, त्यावेळी दिल्ली, पुणे, नगर येथील सर्व लष्करी अधिकारी उपस्थित होते. तेव्हा अॅड.पिल्ले यांनी कॅन्टो.बोर्डच्या अडचणी मांडत असतांना शरद पवार यांनी सांगितले की, माझ्या मतदार संघात तीन कॅन्टों.बोर्ड असल्याने त्यांच्या सर्व अडचणी मला माहित आहेत. यावर रामबाण उपाय म्हणजे सर्व कॅन्टों.बोर्ड बरखास्त करुन तेथे नगर पालिका करण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तत्कालीन खासदार (पुणे) यांच्या विरोधामुळे त्याची अंमल बजावणी होवू शकली नाही, अन्यथा त्यावेळीच सर्व कॅन्टों.बोर्ड कार्य क्षेत्रात नगरपालिका अस्तित्वात आल्या असत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालबाह्य कायदे रद्द करण्याचे धोरण राबविले असल्याने ब्रिटीशकालीन कॅन्टों. बोर्ड बरखास्त करुन त्याऐवजी नगर पालिका आस्तित्वात आणाव्यात. कॅन्टों.बोर्डाचा कायदा कालबाह्य झाला असून, तो रद्द करण्यात यावा, असे नमूद करतांना निवेदनात म्हटले आहे. देशातील 62 पैकी 56 कॅन्टों. बोर्डच्या लोकनियुक्त सदस्यांची मुदत संपुष्टात आली तर 6 कॅन्टों. बोर्डचे कामकाज सुरु आहे. नजिकच्या काळात यासर्व ठिकाणी निवडणुका होणार आहेत. संसदेत कॅन्टों. बोर्ड कायदा दुरुस्तीवर यंदा चर्चा आहे. त्या निर्णयानंतर या ठिकाणी निवडणुका घेणार की बोर्ड पूर्ण बरखास्तीचा निर्णय होणार याकडे सद्या सर्वांचे लक्ष आहे. सद्या कॅन्टों.बोर्ड कायदा दुरुस्ती झाली नसल्याने बोर्डाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यावर्षी बोर्ड कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडण्यात येणार आहे, त्यावेळी संसदेने दुरुस्ती मंजुर न करता देशातील सर्व कॅन्टों.बोर्डच पूर्ण बरखास्तीच्या मागणीचा ठराव मंजूर करण्यात यावा. संसदेच्या वरिष्ठ पातळीवर कॅन्टों.बोर्ड बरखास्तीचा विचार सुरु असल्याने ही संधी साधून संबंधित खासदारांनी बोर्ड बरखास्तींचा ठराव मांडवा. व पक्षविरहित सर्व खासदारांनी या ठरावाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तत्कालीन ब्रिटीशांनी त्या काळात लष्करी हद्दीत नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी कॅन्टों.बोर्डची स्थापना केली होती. परंतु आता लष्करी हद्दीनजिक लोकवसाहती वाढत असल्याने या वसाहतीतून सुविधा पुरविल्या जात आहे, त्यामुळे आता कॅन्टों.बोर्डची गरज राहिलेली नाही. नगरसह राज्यात 7 सह देशात 62 कॅन्टों.बोर्ड अस्तित्वात आहे. अ.नगर (कॅन्टों.बोर्ड) भिंगार, पुणे कॅन्टों.बोर्ड (पुणे कॅम्प), खडकी कॅन्टों.बोर्ड (जि.पुणे), देहुरोड कॅन्टों.बोर्ड (जि.पुणे), देवळाली कॅम्प कॅन्टों.बोर्ड (जि.नासिक), नागपूर कॅन्टों.बोर्ड (कामटी जि.नागपूर) आणि औरंगाबाद कॅन्टों.बोर्ड ही सात बोर्ड राज्यात आहेत.
0 टिप्पण्या