लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शिर्डी: राज्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने
निर्बंध कडक करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही ठिकाणची मंदिरे पुन्हा बंद करण्यात आली आहेत. मात्र, शिर्डीचे साईमंदीर खुलेच ठेवण्याचा निर्णय
संस्थानने घेतला आहे. असे असले तरी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व नियमांचे
काटेकोर पालन करावे लागणार आहे. आगाऊ बुकिंगशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश मिळणार
नाही. मास्कची सक्ती आणि पूजा साहित्य मंदिरात नेण्यास बंदी करण्यात आली आहे.
सुमारे तीन महिन्यांपूर्वी मंदीर खुले करतानाच अनेक
नियम करण्यात आले होते. मधल्या काळात त्यामध्ये शिथीलता येत होती. आता मंदीर बंद
करण्याची वेळ येऊ नये, यासाठी
या नियमांची काटेकोर अमंलबजावणी करण्यात येणार आहे. दररोज सुमारे पंधरा हजार
भाविकांना दर्शनाची सोय करून देण्यात आली आहे. याचे नियोजन करता यावे यासाठी
ऑनलाइन दर्शनपास पद्दत सुरू करण्यात आलेली आहे. असे पास असल्याशिवाय मंदिरात
प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे भाविकांनी शिर्डीत येण्यापूर्वी ऑनलाईन दर्शनपास
घेऊनच यावे, असे आवाहन साईबाबा संस्थानतर्फे करण्यात
आलेले आहे.
संस्थानच्यावतीने सांगण्यात आले की, राज्य शासनाच्या आदेशानुसार १६ नोव्हेंबर
२०२० पासून साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी, शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. अदयाप करोनाचे सावट संपलेले नाही.
सध्या करोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व साईभक्तांनी आपल्या
आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. दर्शनाकरीता ठराविक संख्येनेच
मंदिरात प्रवेश दिला जात आहे. मंदिरात गर्दी होऊ नये म्हणून सलग दोन किंवा जास्त
दिवस सलग सुट्टी आल्याच्या काळात, तसेच गुरुवार, शनिवार, रविवार व सरकारी सुट्टी अथवा महत्वाचे
धार्मिक दिवशी ऑनलाइन पास सक्तीचे आहेत.
या काळात येताना भाविकांनी संस्थानच्या online.sai.org.in या संकेतस्थळावरुन आगाऊ
ऑनलाईन दर्शनपास घेऊनच यावे. पास निश्चित झाल्यानंतरच शिर्डी प्रवासाचे नियोजन
करावे. या वेबसाईटव्दारे सशुल्क दर्शनपास नियोजित दर्शन तारखेची आरक्षण सुविधा
आरक्षण केल्याचे तारखेपासून पुढील पाच दिवसांसाठी तसेच मोफत दर्शनपास नियोजित
दर्शन तारखेची आरक्षण सुविधा आरक्षण केल्याचे तारखेपासून पुढील दोन दिवसांसाठी
उपलब्ध असेल, असेही संस्थानतर्फे सांगण्यात आले.
मास्कचा वापर न करण्या-या साईभक्तांना मंदिरात
प्रवेश मिळणार नाही. दहा वर्षांखालील मुलांना, गरोदर स्त्रिया व ६५ वर्षांवरील व्यक्तींनाही मंदिरात प्रवेश दिला
जाणार नाही. याशिवाय मंदिरात फुलं, हार व इतर पुजेचे
साहित्य नेण्यास सक्त मनाई आहे. जे साईभक्त आजारी आहेत अशा साईभक्तांनी
दर्शनाकरीता येऊ नये. सर्व साईभक्तांनी आपली होणारी गैरसोय टाळण्याकरीता ऑनलाईन
दर्शनपास उपलब्ध करुन निर्धारीत वेळेत दर्शनासाठी शिर्डीत यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या