लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
जुन्नर : एकीकडे बर्ड फ्लूचे सावट असताना मात्र बिबट्याने चिकन पार्टी केल्याची घटना समोर आली आहे.असे काही कि, खामगाव (ता. जुन्नर) येथील संदीप रामदास घोलप या शेतकऱ्याच्या १६० गावठी कोंबड्या बिबट्याने फस्त केल्याची घटना नुकतीच घडली.
खामगाव येथील शेतकरी संदीप घोलप यांची शेतावर गावठी कोंबड्यांची पोल्ट्री आहे. पोल्ट्रीच्या लोखंडी दरवाजामधून बिबट्याने पोल्ट्रीमध्ये प्रवेश केला व १६० कोबड्यांचा फडशा पाडला. घोलप हे सकाळी पोल्ट्रीवर गेल्यानंतर त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधत घटनेची माहिती दिली.
वनविभागाचे वनपाल शिवाजी सोनवणे व वनरक्षक दशरथ डोके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. खामगाव व परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा. तसेच, शेतकरी संदीप घोलप यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायत उपसरपंच अजिंक्य घोलप यांनी केली आहे.
0 टिप्पण्या