तरुणानी अपहरणकर्त्याचा केला सिनेस्टाईल पाठलाग
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पारनेर : मोटार सायकलवर एका अल्पवयीन मुलाला पळवून नेणाऱ्या दोन गुन्हेगारांना जखणगाव, भाळवणी आणि टाकळी खातगावच्या युवकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले व लहान मुलाची सुटका केली.
काल दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान दोन युवक मोटार सायकलवरून एका लहान मुलाचे अपहरण करून भाळवणी मार्गे नगरकडे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भाळवणी येथील तरूणांना फोनद्वारे माहिती दिली. याचवेळी अपहरणकर्ते तरूण शाईन गाडीवर मुलाला घेऊन नगरकडे जात असल्याचे दिसले. यावेळी तरूणांनी त्यांना हटकले असता ते नगरकडे सुसाट निघाले. यावेळी पाठलाग करणाऱ्यांनी जखणगाव मधील तरूणांना याची माहिती दिली. जखणगाव मधील वाळू सप्लायर्स आणि बायपासचे व्यवसायिक तरूण यांनी कुंदन हॉटेल समोर रस्ता अडवून गावात येणारा आणि बायपास रोड दोन्ही बंद केले. यावेळी सुसाट येणारे अपहरणकर्ते पाठलाग करणाऱ्यांना आणि समोर आडवे झालेल्या तरूणांना हुलकावणी देऊन परत माघारी फिरत असताना आपल्या गावातील तरूणांनी त्यांना चपळाईने धक्का देऊन खाली पाडले आणि लहान मुलाला सुखरूप सोडविले.
यावेळी जमलेल्या तरूणांनी अपहरण कर्त्यांना चांगलाच चोप दिला. याचवेळी पोलिस घटना स्थळी पोहोचले असता दोन्ही गुन्हेगारांना पोलिसांच्या ताब्यात देऊन लहान मुलाला पोलिसांकडे सुखरूप दिले. सदर घटनेतील अपहरण केलेला मुलगा अमरावतीचा असल्याचे कळते. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
0 टिप्पण्या