( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर:-मराठवाड्याचा शेजारील जिल्हा म्हणून नगर जिल्ह्यात विशेष दक्षता घेण्यास सुरुवात झाली आहे. लॉकडाऊन अगर संचारबंदीसारखे कडक उपाय अद्याप तरी करण्यात येणार नाहीत. मात्र, कोविड केअर सेंटरसह सर्व वैद्यकीय सुविधा पुन्हा सज्ज करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.
मराठवाडा आणि विदर्भात करोनाचा
प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय
घेण्यात आला आहे. त्यामुळे शेजारील अहमदनगर जिल्ह्यातील
प्रशासन सावध झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी या गुरुवारी सायंकाळी
सविस्तर आदेश काढला असून विभागवार जबाबदाऱ्यांचे वाटपही केले आहे. त्यानुसार सर्व
विभागांना आणि अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. करोनाचा
प्रभाव ओसरला म्हणून बंद करण्यात आलेली कोविड केअर सेंटर, विलगीकरण
केंद्र आणि अन्य सुविधा पुन्हा अद्ययावत करण्याचा आदेश देण्यात आला आहे, कोणत्याही क्षणी आलेल्या रुग्णांसाठी ही यंत्रणा सज्ज होईल, अशी व्यवस्था करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पूर्वी करोना रुग्ण आढळून आला की त्याच्या संपर्कातील
अन्य व्यक्तींची चाचणी घेतली जात होती. ती पद्धत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
मास्क न वापरणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाईचा आदेशही
देण्यात आला आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस आणि महापालिकेची पथके नियुक्त
करण्यात आली आहेत. पूर्वी जशी दक्षता आणि कारवाई केली जात होती, तशीच ती कडक करण्यात येणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध
कायदेशीर कारवाई करण्याचा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
जिल्ह्यात
नव्याने करोना बाधित होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या महिन्यात शंभरच्या आत
आलेली संख्या आता पुन्हा लक्षणीयरित्या वाढली आहे. खासगी रुग्णालयांतही दहा टक्के
रुग्णसंख्या वाढली असल्याचे सांगण्यात येते. आकडे वाढत असल्याने
प्रशासन सावध झाले आहे.
0 टिप्पण्या