Ticker

6/Breaking/ticker-posts

सहलीवर गेलेले निघोज ग्रा.पं.चे दोन सदस्य बेपता !


 लोकनेता न्यूज 

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

निघोज :-  निघोज ग्रामपंचायतीच्या पार पडलेल्या अटीतटीच्या निवडणूकीत त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यानंतर नऊ सदस्यांनी एकत्र येत सत्ता ताब्यात घेण्याच्या सुरू केलेल्या हालचालींना सुरूंग लागला आहे ! सहलीवर गेलेल्या नऊ सदस्यांपैकी दिगंबर भागाजी लाळगे व गणेश दत्तू कवाद हे सदस्य खेड, (जिल्हा पुणे) येथून बेपत्ता झाले आहेत.

या सदस्यांचे शस्त्रांचा धाक दाखवून अपहरण झाल्याचा दावा नऊ सदस्यांच्या गटाच्या प्रमुखांनी केला असून दुसरीकडे हे सदस्य विरोधी संदीप वराळ जनसेवा पॅनलच्या संपर्कात असल्याचीही माहीती हाती आली आहे. त्यांनी दिलेल्या 'लोकेशन' वरूनच खेडमध्ये जेवणासाठी थांबले असता दोघा सदस्यांना तेथून ताब्यात घेण्यात आल्याचीही माहीती हाती आली आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली.

 निघोज ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आ. नीलेश लंके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत जागा वाटपावर सर्वांचे एकमत झाले होते. परंतू सरपंचपद कोणाला द्यायचे यावरून  मतभेद झाले व बिनविरोध निवडीमध्ये खोडा घातला गेला. प्रत्यक्ष ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये ग्रामविकास पॅनल, संदीप वराळ जनसेवा पॅनल व महाविकास आघाडी यांनी उमेदवार उतरविले. संदीप वराळ जनसेवा पॅनलला सर्वाधिक आठ  जागा मिळाल्या.  त्यांच्या दोन उमेदवारांचा निसटता पराभव झाला.  ग्रामविकास पॅनलचे चार, महाविकास आघाडीचे ३ तर वाडयावस्त्यांवरील तिन स्वतंत्र उमेदवार विजयी झाले. संदीप वराळ ग्रामविकास पॅनलला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी ग्रामविकासचे प्रभाग क्रमांक ६ मधून विजयी झालेले दिगंबर भागाजी लाळगे व गणेश दत्तू कवाद, प्रभाग ४ मधून विजयी झालेल्या भावना सतिश साळवे, प्रभाग ३ मधून विजयी झालेल्या अविता शंकर वरखडे, महाविकास आघाडीच्या प्रभाग ६ मधून विजयी झालेल्या सुधामती विठ्ठल कवाद, प्रभाग ५ मधून विजयी झालेले शंकर गबाजी गुंड तर वाडया वस्त्यांचे प्रभाग २ मधील योगेश आनंदा वाव्हळ, ज्योती राहूल पांढरकर व भरत लाला रसाळ या ९ सदस्यांची मोट बांधण्यात आली होती. वेगवेगळया विचारांचे तिन पॅनलचे उमेदवार एकत्र करण्यात आल्याने धोका नको म्हणून सर्व नऊ सदस्यांना आठ दिवसांपूर्वीच सहलीसाठी पाठविण्यात आले होते. कोल्हापूर येथून हे सदस्य खेड, (जि. पुणे) येथे आले असता रविवारी दुपारी त्यापैकी दिगंबर भागाजी लाळगे व गणेश दत्तू कवाद हे नऊ सदस्यांमधून अचानक गायब झाले.

हे सदस्य जेवणासाठी एका हॉटेलवर थांबले होते. लाळगे व कवाद हे लघुशंकेसाठी गेले असता तेथून ते परत आलेच नाहीत. सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार ते आठ ते दहा जणांच्या टोळक्यासोबत असलेल्या वाहनामध्ये बसून तेथून  गायब झाले. नऊ सदस्यांच्या प्रमुखांनी दिलेल्या माहीतीनुसार त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यांच्या अपहरणासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मिळालेल्या माहीतीनुसार हे दोघे सदस्य इतरांच्या संपर्कात होते. त्यांनीच दिलेल्या लोकेशननुसार खेड परीसरापासून आठ ते दहा जण त्यांच्या मागावर होते. ते लघुशंकेसाठी दुर जाताच त्यांना ताब्यात घेण्यात येऊन अज्ञात स्थळी रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

संदीप वराळ गटाच्या सदस्यांनाही हालविले !

नऊ सदस्य सहलीवर गेल्यानंतर संदीप पाटील वराळ जनसेवा पॅनलचे विजयी झालेले आठ सदस्य मात्र निघोजमध्येच होते. रविवारी दुपारी विरोधी गटाचे दोन सदस्य दुर गेल्याची माहीती हाती आल्यानंतर संदीप वराळ पॅनलच्या आठही सदस्यांना एकत्र करून त्यांना निघोजमधून तातडीने बाहेर पाठविण्यात आल्याची माहीतीही हाती आली आहे. मंगळवारी निघोज ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक असून दोन दिवस आगोदर या निवडणूकीत नवा व्टिस्ट निर्माण झाल्याने या निवडणूकीकडे तालुक्याचे लक्ष  लागले आहे. संदीप वराळ पॅनलच्या सदस्यांमध्ये सचिन मच्छिंद्र वराळ, चित्रा सचिन वराळ, मंगेश सखाराम वराळ, जया रावसाहेब वराळ, शबनूर अस्लम इनामदार, ज्ञानेश्‍वर शंकर वरखडे, रूपाली ठकसेन गायखे व मिराबाई दत्तात्रेय घोगरे यांचा समावेश आहे.  दोन सदस्य गायब झाल्यानंतर खेड पोलिसांना त्याबाबत माहिती देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यानी उशिरा घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या