Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या सरपंचनिवडी आज

 

लोकनेता न्यूज 

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नगर:- तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी मंगळवारी एकाच वेळी होत आहेत. महाविकास आघाडी व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले गटाकडून आपल्याच गटाचा सरपंच करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली असल्याने अनेक गावांत तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले आहे. कुणाच्या गटाचे किती सरपंच निवडून आले याचा फैसला आज दुपारनंतर होणार असल्याने पदाधिकारी निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तहसीलदार उमेश पाटील, निवासी नायब तहसीलदार अभिजीत बारवकर यांनी एकाचवेळी तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीसाठी स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिका-यांची नियुक्ती केली आहे. सकाळी १० ते १२ या वेळेत सरपंच व उपसरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. साडेबारा वाजता उमेदवारी अर्जांची छानणी होईल. दुपारी साडेबारा ते एक या दरम्यान अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना माघारीची वेळ राहील. पदाधिकारी निवडीसाठी एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज राहिल्यास दोन वाजता निवडणूक घेतली जाईल. गणपुर्ती ऐवजी सभा तहकूब झाल्यास बुधवारी १० फेब्रुवारीला पुन्हा पदाधिकारी निवडीसाठी सदस्यांची सभा घेण्यात येणार आहे.

दरम्यान मागील आठवडाभरापासून नॉट रिचेबल असलेले बहुतांशी ग्रामपंचायतींचे सदस्य उद्या मंगळवारी सकाळी आपल्या गावात पोहोचत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील सहलीला गेलेल्या बहुतांशी सदस्य कोकण दौ-यावर गेले होते. सोमवारी सायंकाळच्या सुमारास  पुणे महामार्गावरील हॉटेलमध्ये या सदस्यांनी डेरा टाकल्याची माहिती मिळाली. फोडाफोडीच्या राजकारणातील आर्थिक तडजोडींचे व्यवहारही सोमवारी सायंकाळीच पुर्ण करण्यात येत होते. सदस्यांच्या फोडाफोडीचे पडसाद गावासह तालुका पातळीवरही उमटले आहेत. काही गावात स्थानिक पातळीवर पक्षापेक्षा गटतटाच्या राजकारणामुळे वेगळी राजकीय समीकरणे आकाराला येत आहेत. माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले व महाआघाडीचे नेते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे हे स्वतः प्रत्येक ग्रामपंचायतीवर लक्ष ठेवून आहेत. कुणाच्या ताब्यात किती ग्रामपंचायती आल्या याचा फैसला दुपार नंतर होणार असल्याने संपुर्ण तालुक्याचे लक्ष या निवडीकडे लागले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या