Ticker

6/Breaking/ticker-posts

‘या’ महामार्गावर अवघ्या ७ किलोमीटरमध्ये २२ गतिरोधक

 


लोकनेता न्यूज 

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 अहमदनगर :- शहरातून जाणाऱ्या नगर- औरंगाबाद महामार्गावर गतिरोधक उभारण्याचा विडाच जागतिक बँक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी उचलला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय ते शेंडी बायपास चौकापर्यंतच्या अवघ्या ७ किलोमीटरच्या अंतरात तब्बल २२ ठिकाणी अनधिकृत गतिरोधक उभारण्यात आले आहेत.

नगर-औरंगाबाद महामार्गावरील नगर ते वडाळा (ता. नेवासा) दरम्यान महामार्ग तयार करण्यापासून देखभाल व दुरुस्तीचे काम अशोका बिल्डकॉन कंपनीमार्फत करण्यात येत आहे. जवळपास १५ वर्षांपूर्वी हे काम कंपनीला देण्यात आले. या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. प्रवासी वाहतुकीसह मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे साहजिकच अनेक ठिकाणी अपघात होतात. त्याला वेगमर्यादा न पाळल्याचेही कारण आहे.

वाहनचालक वेगमर्यादा पाळत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शहर वाहतूक शाखेसह जिल्हा वाहतूक शाखा व महामार्ग पोलिस कार्यरत आहेत. मात्र या महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या अनधिकृत गतिरोधकांची संख्या पाहता वाहनांच्या वेगाला लगाम घालण्याचे पोलिसांचे काम आता जागतिक बँक प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी हातात घेतले की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

वास्तविक पाहता महामार्गांवर गतिरोधक उभारू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यातही रस्ता सुरक्षा समितीच्या परवानगीनंतरच एखाद्या ठिकाणी खरोखरच आवश्यकता असल्यास गतिरोधक उभारण्याची परवानगी देण्यात येते. मात्र जागतिक बँक प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मात्र स्वतः गतिरोधक उभारण्याचा कुठलाही अधिकार नसताना अशोका बिल्डकॉनला गतिरोधक उभारणीचे पत्र देत असल्याने त्यांच्यावर असा कुठला दबाव आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गतिरोधकांबाबत निर्णय घेणारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील रस्ता सुरक्षा समिती कागदावरच असून, गतिरोधक उभारण्याचे सर्वच नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत.

 ‘या’ ठिकाणी अनधिकृत गतिरोधक

नगर- औरंगाबाद या महामार्गावर मुकुंदनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉर्नरला दोन गतिरोधक, बीटीआर गेटसमोर २, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर २, गुलमोहोर रोड कॉर्नरजवळ २, हॉटेल चेतना समोर २, रिलायन्स पेट्रोल पंपासमोर २, त्यापुढे लगेचच २ ठिकाणी, वारूळवाडी कमानीसमोर २, हॉटेल रविराजसमोर २, पोखर्डी गावाच्या कमानीसमोर २, शेंडी बायपास चौकात २ आदी ठिकाणी अनधिकृत गतिरोधक लावण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या