लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई ः पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम इंग्रजी भाषेबरोबर मराठी भाषेतही उपलब्ध करून द्यावा, असा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मातृभाषेत तंत्र शिक्षण घेण्यास मदत आणि त्या विषयाची समज अधिक स्पष्ट होण्यास, मदत होईल असेमत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
ग्रंथालय संचालनालय आयोजित प्रबोधन पाक्षिक शताब्दी वर्ष आणि मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. सामंत पुढे म्हणाले की मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ भाषा असून आपल्या मातृभाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.
मराठी भाषा दिन देशभरासह जगभरात साजरा केला जातो. प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी भाषेचा वापर होणे आवश्यक असून यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचाराचे कार्य केवळ मराठी भाषा गौरव दिनापुरते मर्यादित ठेवू नये. ते 365 दिवस चालू ठेवणे आवश्यक आहे.
दिल्लीत मराठी विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षण देणार्या नूतन विद्यालयाच्या विकास आणि नूतनीकरणाच्या कामासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करणार्या मराठी विद्यार्थ्यांसाठी दिल्लीत राहण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सीमा भागातील मराठी विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. प्रबोधन पाक्षिकाचे शताब्दी वर्ष आपण साजरे करतोय, ही निश्चितपणे आनंदाची बाब आहे.
राज्यामध्ये सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरूवात प्रबोधनकार ठाकरे यांनी केली. राज्याच्या जडणघडणीत त्यांचे स्थान हे अनन्यसाधारण असून त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हेच खर्याअर्थाने त्यांचे स्मरण असेल. असेही उदय सामंत म्हणाले.
0 टिप्पण्या