Ticker

6/Breaking/ticker-posts

लाभले आम्हास भाग्य., आम्ही बोलतो मराठी..!

 मराठी राजभाषा दिन विशेष .. लेख

लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

२७ फेब्रुवारी मराठी भाषा दिन व श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांची जयंती. या देशाच्या पृष्ठभागावर जो मराठी बोलतो, जो-जो मराठी जाणतो, जो-जो मराठी लिहितो ,त्याच्या दृष्टीने आणि मराठी भाषेच्या सन्मानाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा दिवस. 

खरं म्हणजे शालेय जीवनापासून मी वडिलांच्या मदतीने वाचनाशी एकरुप झालो. त्यातून माझे साहित्य फुलत गेले आणि आज वाचन हे माझे जीवन बनले आहे. एक तरी पान वाचल्या शिवाय माझा दिवस मावळत नाही. अगदी खरं वाचनाने मला जे साध्य झालं ते म्हणजे माणसे जोडण्याची कला, माणसाबद्दलच प्रेम . माणुसकी जपणं म्हणजे काय?आणि समाजात जगणं म्हणजे काय? हे नेमकं मला उमजलं ते साहित्य वाचनामुळे . 

त्यामुळे  नव्या पिढीला माझी विनंती राहील  की, आपण आपल्या अभ्यासाबरोबर पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे, म्हणजे आपल्याला जीवन जगण्याचा अर्थ कळेल. मला या वाचन प्रवासात पुस्तके वाचताना आधुनिक मित्र मिळाला तो म्हणजे स्वर्गीय राजीव राजळे यांच्या रूपाने . ज्यांनी इंग्रजी, मराठी या सर्व भाषेतील अतिउत्तम पुस्तके वाचली होती . त्यांनी मला आत्मचरित्र, विशेष पुस्तके वाचण्याची विशेष रुची निर्माण करून दिली.  दुर्दैवाने म्हणावं लागतं आपण मराठी बोलतो पण मराठी वाचनाचा कंटाळा करतो . फक्त वृत्तपत्र वाचले की मराठी वाचलं असं होत नाही, त्यासाठी कथा, कादंबरी, आत्मचरित्र ललित लेखन ,अनुवादीत लेखन, कवितासंग्रह याचे वाचन केले पाहिजे. 

आपण जर पाहिलं तर भारतात केरळमध्ये सर्वाधिक साहित्य वाचल जाते. मी युरोप मध्ये  फिरत असताना मला निवांत बसून वाचणारी अनेक लोक भेटली. आपण कधी गोव्याला भेट दिली तर आपल्याला जाणवेल अनेक परदेशी पाहुणे हे निवांत  वाचताना आपल्याला दिसतील . त्या वाचनातून ते आनंद घेत असतात आणि जीवन जगत असतात. वाचन हे जीवनात स्वतःला एकाकी पडू देत नाही ,जगण्याचा आधार देते, बळ देते आणि म्हणून प्रत्येकाने मराठी भाषेवर प्रेम करताना मराठी साहित्यावर प्रेम केले पाहिजे. माझ्या घरात अनेक पुस्तके आपल्याला दिसतील  ते पुस्तके मला आधार देतात . तेव्हा प्रत्येकाने वाचनाची सवय लावून घ्यावी . दिसमाजी जे - जे जमेल ते - ते वाचत जावे एवढीच आजच्या मराठी दिनाची अपेक्षा ...

 *लाभले आम्हास भाग्य, आम्ही बोलतो,जहलो खरेच धन्य ऐकतो मराठी* 

 मराठी भाषा दिनाच्या सर्व मराठी मनाला हार्दिक शुभेच्छा ..

- किशोर मरकड

कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद 

शाखा, अहमदनगर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या