मुंबई: एरवी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांच्या निर्णयांमधील त्रुटींवर नेमकेपणाने बोट ठेवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी काल मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीरपणे कौतुक केले. राज्यसभेत मंगळवारी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार खासदारांचा निरोप समारंभ पार पडला. गुलाम नबी आझाद यांच्याविषयी बोलताना मोदी भावूक झालेले दिसले.
आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या या कृतीचे ट्विटरवरुन जाहीरपणे कौतुक केले. राज्यसभेत विरोधी पक्षनेत्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झालेले पाहायला मिळाले. पक्षीय मतभेद असावेत पण मनभेद नसावेत, या भारतीय राजकारणातील आपल्या पूर्वसूरींनी घालून दिलेल्या मार्गावरुन मोदींजींना चालताना पाहून आनंद वाटला, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधानांना अश्रू अनावर का झाले?
राज्यसभेत मंगळवारी जम्मू आणि काश्मीरच्या चार खासदारांना निरोप देण्यात आला. यात काँग्रेसचे राज्यसभेतले नेते गुलाम नबी आझाद यांचाही समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी चारही खासदारांबद्दल गौरवोदगार काढले. पण गुलाम नबी आझाद यांंचा गौरव करताना मात्र मोदी एवढे भावनावश झाले की एक वेळेस त्यांचा आवाज येणं बंद झालं. सभागृहात त्यावेळेस प्रचंड शांतता पसरली. मोदींची अशी अवस्था एक दोन मिनिटे नाही तर जवळपास पाच मिनिटं होती. मोदी आझादांबद्दल बोलत होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. जवळपास तीन वेळेस मोदींनी अश्रू पुसले. दोन वेळेस पाणी घेत स्वत:ला सावरण्याचाही मोदींनी प्रयत्न केला. पण काँग्रेस नेत्याबद्दल बोलताना मोदींचे अश्रू थांबले नाहीत.
0 टिप्पण्या