लोकनेता न्यूज
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
अ . नगर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री व राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री असे सध्याचे चित्र आहे. पण काँग्रेसलाही आणखी एक उपमुख्यमंत्रीपद दिले जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर जलसंपदा तसेच महिला व बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी येथे सूचक भाष्य केले आहे. 'राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रीपद दिले गेले तर तिसरा उपमुख्यमंत्री अपक्षांचा करावा लागेल', असे सूचक उदगार व्यक्त करून त्यांनी नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू नगर येथून औरंगाबादला जात असताना त्यांचे प्रहार संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यामध्ये सध्या अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. राज्य सरकारमध्ये आता दोन उपमुख्यमंत्री दिसणार का? राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद असताना आता काँग्रेसकडूनही उपमुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेब थोरात यांचे नाव चर्चेत असल्याबाबत त्यांना विचारले असता बच्चू कडू म्हणाले, 'तसे काही नाही. पण, जर असे झाले तर तिसरा उपमुख्यमंत्री अपक्षांना दिला पाहिजे,' असे सूचक उदगार त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसचे दोन उपमुख्यमंत्री झाले तर सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची काय भूमिका असेल व त्यांनाही या पदाची संधी मिळेल का, याची उत्सुकता व्यक्त होत आहे.
कायद्यामागे विदेशी कंपन्या
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना कडू म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रामाणिक आहेत. पण त्यांच्यावर विदेशी भांडवलदारांचा दबाव आहे. त्यामुळे शेतकरी मेला तरी बेहत्तर, पण विदेशी भांडवलदार वाचला पाहिजे, याच भूमिकेतून दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन लांबत आहे,' असा आरोप त्यांनी केला. विदेशी भांडवलदारांच्या दबावामुळे नवे कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत. या कायद्यांच्या पाठीमागे केवळ अदानी, अंबानीच नाही तर विदेशी कंपन्या आहेत, असा दावाही कडू यांनी केला.
नो कॉमेंटस्
दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 30 जानेवारीला पुकारलेले उपोषण आंदोलन मागे घेतले आहे. त्याबाबत बोलताना कडू म्हणाले की, 'आंदोलन मागे घेणे हा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्याबद्दल मी बोलणार नाही. पण अण्णांचे व आमचे जुने संबंध आहेत. त्यामुळेच मी राळेगण सिद्धीच्या मार्गाने चाललो होतो, तेव्हा अण्णांची भेट घ्यावी, हा एकच उद्देश होता. कारण, माझ्या निवडणुकीच्यावेळी अण्णा माझ्या प्रचारासाठी आले होते,' असे सांगून या विषयावर त्यांनी नो कॉमेंटस् असा निर्दश दिला .
0 टिप्पण्या