लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पुणे: कुख्यात गुंड गजा मारणे याला जंगी
मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन करण्याचा नाद चांगलाच महागात पडला आहे. कारण, पोलिसांनी आता गजा मारणे याच्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार
आहे. त्यामुळे सध्या फरार असलेल्या गजा मारणेच्या अडचणीत आणखीनच भर पडणार आहे.
एका
खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची
तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. तळोजा ते पिंपरी-चिंचवडपर्यंत काढण्यात
आलेल्या या मिरवणुकीत जवळपास 300 गाड्या होत्या. या सगळ्या गाड्यांनी
उर्से टोलनाक्यावर टोल भरला नव्हता. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत सर्व
वाहने पुढे नेली होती. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्यामुळे
आता पोलिसांकडून गजा मारणे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याची
माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.
नेमकं काय घडलं होतं?
पप्पू
गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या
साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. गजा मारणे हा
त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. या
मिरवणुकीत जवळपास 300
गाड्या होत्या. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे
थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण
करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते.
ती लँडक्रुझर होणार जप्त?
गजा मारणे ज्या गाडीत बसून तळोजा कारागृहातून बाहेर पडला ती
लँडक्रुझर कार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत नारायण गलांडे यांच्या कुटुंबीयांच्या
मालकीची होती. या गाडीची सध्याची किंमत जवळपास दोन कोटी रुपये इतकी आहे. पुण्यात
हाताच्या बोटावर मोजणाऱ्या लोकांकडेच ही कार आहे.
गजा मारणेच्या मिरवणुकीनंतर आता ही कार पोलिसांनी ताब्यात घेतली
आहे. त्यामुळे लँडक्रुझर कार गुंडाला देणे नारायण गलांडे यांना भलतेच महागात पडले,
अशी चर्चा सुरु आहे.
मारणे फरार
या
सगळ्या प्रकरणानंतर गजा मारणे फरार झाला आहे. वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये
दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी गजानन मारणे फरार असल्याची माहिती देण्यात आली
होती. मारणेच्या शोधासाठी वारजे पोलिसांनी स्वतंत्र पथकं नेमली आहेत.
संबंधित
पोलीस पथकांनी मारणेसह त्याच्या साथीदारांच्या घरांसह लपण्याच्या विविध ठिकाणी
अचानक छापेमारी सुरु केली आहे. आरोपींना लपण्यास मदत करणाऱ्यांवरही कठोर कारवाई
करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. मारणेच्या संपत्तीची आणि बँक खात्यांची
माहितीही गोळा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे निश्चित मुदतीत गजानान मारणे सापडला
नाही तर त्याची मालमत्ता जप्तीची कारवाई देखील सुरु करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या