Ticker

6/Breaking/ticker-posts

हजारे ट्रॉफीत पृथ्वी शॉचा झंझावात, वेगवान 227 धावा


 

लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 मुंबई:- इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियातून वगळल्यानंतर मुंबईकर पृथ्वी शॉ देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत झंझावात करत आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पृथ्वी शॉने मुंबईकडून खेळताना वादळी द्विशतक ठोकलं आहे. कर्णधार श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत संघाची धुरा सांभाळताना, पुद्दुचेरीविरोधात पृथ्वी शॉने दणक्यात खेळी केली. पृथ्वी शॉने अवघ्या 142 चेंडूत द्विशतक झळकावलं. नाबाद 227 धावा ठोकणारा पृथ्वी शॉ भारताचा लिस्ट ए मधील सातवा तर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील चौथा द्विशतकवीर ठरला. पृथ्वी शॉच्या द्विशतकामुळे मुंबईने निर्धारित 50 षटकात 4 बाद 457 धावा कुटल्या.

21 वर्षीय पृथ्वी शॉने आपल्या झंझावाती खेळीत 31 चौकार आणि  5 षटकार ठोकले. पृथ्वी शॉने 152 चेंडूत नाबाद 227 धावा ठोकल्या. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये एखाद्या कर्णधाराने ठोकलेली ही सर्वाधिक धावसंख्या आहे.

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आज मुंबई विरुद्ध पुद्दुचेरी यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याऐवजी पृथ्वी शॉ संघाचं नेतृत्व करत आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच नेतृत्त्व करताना, पृथ्वी शॉने पुद्दुचेरीच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली.

लिस्ट ए मध्ये यापूर्वी सहा जणांनी द्विशतकं झळकावली आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, शिखर धवन, संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांचा समावेश आहे. या यादीत आता पृथ्वी शॉचं नाव समाविष्ट झालं आहे. विजय हजारे ट्रॉफीतील पृथ्वी शॉचं हे दुसरं शतक आहे. यापूर्वी दिल्लीविरुद्धच्या लढतीत पृथ्वी शॉने नाबाद 105 धावा ठोकल्या होत्या.

सूर्यकुमार यादवच्याही घणाघाती 133 धावा

एकीकडे पृथ्वी शॉ बरसत होता तर दुसरीकडे मुंबईचा सूर्यकुमार यादवही तळपत होता. कारण सूर्यकुमार यादवने अवघ्या 58 चेंडूत 133 धावा ठोकल्या. पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांच्यात जणू फटकेबाजीची स्पर्धाच लागली होती. पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवने तिसऱ्या विकेटसाठी 103 चेंडूत तब्बल 201 धावांची भागीदारी रचली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या