Ticker

6/Breaking/ticker-posts

JEE मुख्य परीक्षा 2021-22 साठी बारावीत 75 टक्के गुणांची अट रद्द

 


नवी दिल्ली : जेईई मुख्य परीक्षेसाठी किमान 75 टक्के गुणाच्या अटीतून विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली आहे. बारावी परीक्षेत कमीतकमी 75 टक्के गुण घेण्याची अट या वर्षी लागू होणार नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे.

आयआयटी जेईईसाठी (JEE) घेतलेला निर्णय आणि मागील शैक्षणिक वर्षासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने, शिक्षण मंत्रालयाने पुढील शैक्षणिक वर्ष 2021-22 साठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) साठी इयत्ता बारावीमध्ये किमान 75 टक्के गुण मिळविण्याचे पात्रता निकष शिथिल केले आहेत. एनआयटी, आयआयआयटी, एसपीए आणि इतर सीएफटीआयशी संबंधित प्रवेश जेईई (मुख्य) वर आधारित आहेत.

राष्ट्रीय चाचणी संस्थे (एनटीए) द्वारे घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी), भारतीय अभियांत्रिकी विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (IIEST), शिबपूर (पश्चिम बंगाल) आणि इतर केंद्रीय अनुदानित तांत्रिक संस्था (सीएफटीआय - आयआयटी वगळता) मध्ये विविध यूजी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो.

आयआयटी / एनआयटी / आयआयआयटी आणि इतर सीएफटी अभ्यासक्रमामधील विद्यार्थ्यांचे प्रवेश हे जेईई रँकवर आधारित आहेत. या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळण्यास पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत किमान 75 टक्के गुण मिळाले पाहिजेत किंवा संबंधित मंडळांकडून घेण्यात आलेल्या 12 वी च्या परीक्षेत अग्रणी 20 टक्क्यांमध्ये असले पाहिजेत. अनुसूचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी बारावीच्या परीक्षेतील पात्रता गुण 65 टक्के आहेत. जेईई (ऍडव्हान्स) परीक्षेची तारीख जाहीर करताना, शिक्षणमंत्र्यांनी विद्यर्थ्यांच्या सुविधेसाठी शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठी इयत्ता बारावीमध्ये किमान 75 टक्के गुण मिळवण्याची पात्रता निकष शिथिल केल्याचे जाहीर केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या