Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगावच्या दुहेरी हत्याकांडचे रहस्य उलगडले ; एक ताब्यात ,

 दागिने व पैशासाठीच झाला खून 


लोकनेता न्यूज

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क

शेवगाव : -तालुक्याला हादरून सोडणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचे रहस्य उलगडण्यास शेवगाव पोलिसांनी यश आले असून या प्रकरणातील एका आरोपीला बिडकीण येथुन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तर आरोपींचा शोध सुरू आहे. पैसे व दागिन्यांच्या मोहातुन हे हत्याकांड केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.सल्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी सांगितले आहे. 

       शहरातील आयटीआय जवळील नविन ईदगा मैदानात रविवार ( दि.२४ ) रोजी अज्ञात महिलेचे शिर नसलेले धड मिळून आले होते, 'त्या' महिलेचे शिर शोधत असतांना आणखी एक मुलाचा मृतदेह मिळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. या दुहेरी  हत्याकांडानंतर पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी शेवगावमध्ये दाखल होऊन वरीष्ठ अधिकाऱ्यांना तपासकामी सुचना दिल्या होत्या. 

      दरम्यान आरोपीच्या शोधासाठी नाशिक, औरंगाबाद तसेच मध्यप्रदेश येथे वेगवेगळे पथक रवाना करण्यात आले.पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी शेवगाव,पाथर्डी येथे विविध ठिकाणी संबंधित महिला व मुलाच्या संदर्भात चौकशी केली. याचवेळी मृतदेह सापडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मयत मुलगा व त्याच्या सोबत एक इसम फिरत असल्याचे चित्रीकरण पोलिसांना मिळाले होते. त्यानंतर तपासाची चक्रे अधिक गतिमान करत औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन येथून नेकपालसिंग पोटीयासिंग चितोडीया यास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हत्याकांडाची कबुली दिली आहे. 

         प्राथमिक तपासात सदर मृत महिलेच्या जवळील चांदीचे दागिने व पैशासाठी 'त्या' दोघांना मारल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. हत्याकाडांतील मृतदेहांची पोलिसांना ओळख पटली असून कमलाबाई कागडीसिंग चितोडीया ( अंदाजे वय ७० ) तर सुनिल उर्फ टकल्या बिट्टूसिंग चितोडीया ( वय १० ) असे मयतांची नावे आहेत. दोघांचे आजी व नातू असे नाते असल्याचे तपासात उघड झाले आहे. दोघेही राजस्थान राज्यातील चितोडगडचे रहिवासी आहेत. 

      इतर आरोपींचा पोलिस शोध घेत असून लवकरच गुन्ह्याच्या संदर्भातील अधिक माहिती हाती लागणार आहे.घटनेनंतर आठ दिवसात पोलिसांना मृतांची नावे निष्पन्न करुन आरोपीला गजाआड करण्यात यश मिळाले आहे. पोलिसांचा तपास सुरु असताना घटनास्थळापासून काही अंतरावर अहिल्यानगर याठिकाणी महिलेचे शिर मिळून आले आहे. याला पोलिस निरीक्षक पाटील यांनी दुजोरा दिला आहे. प्राण्यांनी खाल्ल्याने केवळ मानवी टवकी शिल्लक राहिली आहे. याबाबतची माहिती परिसरातील काही नागरिकांनी पोलिसांना दिली होती. या प्रकरणात आणखी आरोपी सहभागी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचा तपास सुरु असल्याने अधिक माहिती प्रसार माध्यमांना देणे त्यांनी टाळले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या