Ticker

6/Breaking/ticker-posts

खळबळजनक : संगमनेरमध्ये ज्येष्ठ नागरिकाने रॉकेल ओतून पेटवून घेतले .


 संगमनेर : - जागेच्या व्यवहाराचा न्यायालयात सुरू असलेला वाद पोलििसांनी हस्तक्षेप करून मिटवावा या मागणीीसाठी खांडगांव येथील एका ज्येष्ठ नागरिकाने आज प्रजासत्ताकदिनी तहसीलच्या आवारात स्वतःच्याअंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहेे  पोलिसांनी तत्परतेने त्याला विझविण्याचा प्रयत्न केला तरीही सदर वृद्ध साठ टक्के भाजल्याने त्याला पुढील उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले .

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खांडगाव शिवारातील गणेशवाडी येथील अनिल शिवाजी कदम (वय 70) यांनी काही वर्षांपूर्वी गणेशवाडीतील सादीक रज्जाक शेख व सुमय्या सादीक यांच्याशी एका जागेचा व्यवहार केला होता. त्यापोटी दोघांमध्ये साठेखतही (विसार पावती) झाले होते. मात्र व्यवहार पूर्ण होत नसल्याने त्या दोघांमध्ये वाद होते. हा वाद अखेर न्यायालयात दाखल झाला आणि सध्या न्यायप्रविष्ठ आहे. असे असतांनाही या वादात हस्तक्षेप करुन पोलिसांनी आपल्या घरातील शेख कुटुंबियांना बाहेर काढावे अशी कदम यांची मागणी होती.

मात्र, सदर प्रकरण न्यायालयीन प्रक्रीयेत असल्याने पोलिसांना त्याबाबत कोणतीही कारवाई करणं अशक्य होते. मात्र सदरच्या ज्येष्ठ नागरिकाला वारंवार समजावून सांगूनही ते आपल्या मागणीवर कायम होते. त्यातूनच त्यांनी तीन दिवसांपूर्वी 24 जानेवारी रोजी पोलिसांना निवेदन देवून आपल्या घरात अनाधिकाराने वास्तव्य करणार्‍या कुटुंबाला बाहेर न काढल्यास प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. पोलिसांना अर्ज प्राप्त झाल्याच्या क्षणापासून त्यांनी कदम यांचा कसून शोध घेतला, मात्र गेल्या वर्षीचा अनुभव पाठीशी असल्याने अर्ज देताच कदम भूमिगत झाले होते.

आज सकाळी शासकीय ध्वजारोहनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्यात परतत असतांनाच आधीच तहसील कार्यालयाच्या आवारात हजर झालेल्या अनिल कदम यांनी कोणाला काही कळायच्या आतच अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. सदरचा प्रकार लक्षात येताच शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजू गायकवाड यांनी त्यांच्याकडे धाव घेत पेटलेल्या कदम यांच्यावर पाणी टाकून त्यांना विझवले व तत्काळ शहर पोलीस ठाण्याच्या सरकारी वाहनातून त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यात ते सुमारे साठ टक्के भाजल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी नगरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

सदर इसमाच्या मागणीचे प्रकरण गेल्या काही वर्षांपासून न्यायप्रविष्ठ आहे, त्यामुळे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. गेल्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनीही त्यांनी असाच प्रकार करण्याचे नियोजन केले होते, मात्र पोलिसांनी त्यांना तत्पूर्वीच अटक केल्याने त्यावेळी अनर्थ टळला. गेल्या वर्षीचा अनुभव घेवून यावर्षी मात्र अनिल कदम यांनी अर्ज देताच स्वतःला भूमिगत केले. पोलिसांनी त्यांचा कसून शोध घेवूनही ते आढळून आले नाहीत. आज सकाळी असे काही घडेल याची पुसटशीही कल्पना नसतांना अचानक त्यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याने पोलीस ठाण्याच्या परिसरात काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र सहाय्यक फौजदार राजू गायकवाड यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या घटनेत अनिल कदम यांच्या मानेपासून गुडघ्यापर्यंतचा भाग व दोन्ही हातांना गंभीर इजा झाली असून त्यांना सुरुवातीला खासगी रुग्णालयात व नंतर नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रतासत्ताक दिनीच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या