अहमदनगर: नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यभरातून पाचशेपेक्षा जास्त युवा सदस्य निवडून आले आहेत. राजकारणाची पहिली पायरी चढलेल्या या युवकांना विशेष प्रशिक्षण देऊन समाजसेवेसाठी सज्ज करण्यात येणार आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली आहे.
नेतृत्व तयार होण्यासाठी निवडणूक एक मोठी संधी असते. आपण स्वतः देखील दहा वर्षे जिल्हा परिषद सदस्य राहिलो आहोत. त्यामुळे आपल्याला या गोष्टीची जाणीव आहे की, या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या माध्यमातून नेतृत्व तयार होण्यास कशा पद्धतीने मदत होते. आमचे नेते माजी पंतप्रधान, भारतरत्न राजीव गांधी यांचे स्वप्न होते की, पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून युवकांनी राजकारणात पुढे आले पाहिजे आणि समाजाचे नेतृत्व करायला हवे. यासाठी त्यांनी पंचायत राज व्यवस्थेचे बळकटीकरणही केले. १८ वर्षांच्या तरुणाला निवडणुकीमध्ये उमेदवारी करण्याचा आणि मतदान करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत युवकांना त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळेच ही क्रांती होऊ शकलेली आहे. निवडून आलेल्या सदस्यांचे अभिनंदन. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला निवडून आलेल्या सर्व सदस्यांसाठी लवकरच एक प्रशिक्षण शिबिर घेण्यात येईल. यामध्ये त्यांना सामान्य माणसाप्रती जबाबदार प्रतिनिधित्व करण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल,’ असेही तांबे यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या