अहमदनगर :- जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती काहीही असली तरी जिल्हा बँकेच्या कारभारात राजकीय जोडे बाहेर काढून ठेवण्याची परंपरा पूर्वसूरींनी जपली आहे. तीच आजतागायत सुरू आहे. पण ही परंपरा बँकेच्या प्रत्यक्ष कामात जपली जाते. बँकेच्या निवडणुकीत मात्र जोरदार संघर्ष नेहमी होतो. जिल्ह्यातील बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे या दोन दिग्गज नेत्यांभोवतीच ही निवडणूक फिरते. त्यात मग काळाची पावले ओळखून काहीजण दोन्हीपैकी सोयीचा गट निवडून त्यासमवेत राहतात. पण राजकीय पक्ष बदलांचाही व राज्यातील सरकार व राजकीय स्थितीचाही परिणाम या निवडणुकीवर होतो. मागच्यावेळी बँकेच्या निवडणूक काळात राज्यात भाजप सरकार होते व त्यावेळी निवडणुकीनंतर बहुमत जमवून सत्ता ताब्यात घेण्याचे भाजपचे प्रयत्न होते. पण नंतर जिल्ह्यातील दिग्गजांनी तसे होऊ दिले नाही. या पार्श्वभूमीवर यंदा राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे व त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या ताकदीविरोधात एकटा भाजप या निवडणुकीत उतरणार आहे. त्यामुळे निवडणूक रंगतदार होणार आहे.
0 टिप्पण्या