Ticker

6/Breaking/ticker-posts

कोरोना : भारतात लसीकरणाची तारीख जाहीर

 नवी दिल्ली : कोरोना व्हायरसवरील दोन लसींना केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर लसीकरण कधी सुरु होणार याबाबत देशभरात चर्चा सुरु होती. येत्या 16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाची रंगीत तालीम देशभर सुरु होती. दोन टप्प्यात ड्राय रन घेण्यात आलं होतं. त्यानंतर आता प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात होत आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार आहे. त्यानंतर 50 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना कोरोना लस देण्यासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी नागरिकांचं लसीकरण होणार आहे.

कोविड 19 लसीकरणाबाबत राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला कॅबिनेट सचिव व आरोग्य सचिवांखेरीज इतर अधिकारी उपस्थित होते. या आढावा बैठकीनंतर लसीकरणाची तारीख निश्चित करण्यात आली. काल म्हणजे शुक्रवारी संपूर्ण देशात दुसऱ्यांदा ड्राय रन घेण्यात आलं. या दरम्यान लसीची तयारीचा आढावाही घेण्यात आला.

पंतप्रधानांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत 11 जानेवारीला बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 जानेवारी रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. परंतु त्याआधी लसीकरणाची तारीख जाहीर झाली आहे. या व्यतिरिक्त, लोकांमध्ये लसीसंबंधीची भीती दूर करण्यासाठी सत्ताधारी भाजप मोठ्या प्रमाणात मोहीम राबवत आहे. देशात सध्या भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सिन' आणि ऑक्सफोर्ड अॅस्ट्रॅजेनेकाची 'कोविशिल्ड' या लसींना 3 जानेवारीपासून आपत्कालीन वापरासाठी मंजूर देण्यात आली आहे. कोविशिल्डची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या