राळेगणथेरपाळ ते बेल्हे रस्त्याचे निकृष्ठ काम : हजारे यांच्याकडून दखल
पारनेर :- बेल्हे, जि. पुणे ते राळेगणथेरपाळ दरम्यान सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातील गैरप्रकारची ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गंभीर दखल घेतली आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत हजारे यांच्या भेटीला गेलेल्या खा. सुजय विखे यांचे हजारे यांनी या कामावरून कान टोचले. तुम्ही भुमिपुजन केले. आता रस्त्याचे काम चांगले करून घ्या, काम निकृष्ठ होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे हजारे यांनी खा. विखे यांच्या निदर्शनास आणून दिले.
हजारे यांच्या तक्रारीनंतर ठेकेदारास बोलवून घेऊन चांगले काम करण्यासंदर्भात सुचना दिल्याची सारवासारव विखे यांनी केली. परंतू विखे व हजारे यांच्या भेटीनंतरही ठेकेदाराच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये तसूभरही फरक पडलेला नाही. घाईने काम उरण्याचा प्रयत्न सुरू असून शासनाच्या कोटयावधींच्या निधीला त्यामुळे चुना लागणार आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना काही ठराविक मापदंड ठरवून देण्यात आलेले आहे. त्यापैकी एकाही मापदंडाची पूर्तता या ठेकेदाराकडून करण्यात आली नसल्याचे दिसून येते. आहे त्याच रस्त्यावर डांबर शिंपडून खडी तसेच कच टाकण्यात येउन अक्षरशः काम उकरण्यात आले आहे. रस्त्याची रूंदी वाढविताना साईडपट्टया मजबूत करणे आवष्यक असताना त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. रस्त्यांवरील पुलांना कठडे नसल्याने अपघातांची मालीका सुरू झाली आहे. आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लक्ष घातल्यानंतर अधिकारी तसेच खासदार सुजय विखे हे काय भुमीका घेतात याची उत्सुकता आहे.
0 टिप्पण्या